पुणे : शहरातील दळणवळण गतिमान करण्यासाठी प्रस्तावित करण्यात आलेला येरवडा ते कात्रज हा भुयारी मार्ग २० किलोमीटर लांबीचा आहे. या मार्गाच्या १ किलोमीटरसाठी साधारणपणे ४०० कोटी रुपये खर्च येणार आहे. त्यामुळे हा रस्ता तयार करण्यासाठी सर्वसाधारणपणे ८ हजार कोटींचा निधी लागणार आहे. या मार्गाचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार केला जाणार असून, तो राज्य सरकारकडे सादर केला जाणार आहे.

‘शहरातील वाहतूक सुधारावी, यासाठी येरवडा ते कात्रज हा भुयारी मार्ग तयार करावा. हा भुयारी मार्ग ‘ट्वीन टनेल’ पद्धतीचा असावा. यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करावा. याबाबतचा प्रस्ताव तातडीने सादर करण्यात यावा,’ असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या बैठकीत दिले होते. या भुयारी मार्गाबाबत पुणे महापालिकेचे आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांना विचारले असता, ते म्हणाले, ‘पुणे शहरात पूर्व ते पश्चिम जोडणारे अनेक रस्ते आहेत. पण उत्तर ते दक्षिण जोडणारे मार्ग कमी आहेत. त्यामुळे ‘पीएमआरडीए’ने येरवडा ते कात्रज भुयारी मार्ग करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे.’

या कामाची प्रत्यक्ष पाहणी करून त्याचा सविस्तर अभ्यास केला जाईल. त्याचा अहवाल तयार करून राज्य सरकारकडे पाठविला जाईल, त्यानंतर त्याचा पुढील निर्णय होईल, असेही डॉ. भोसले यांनी स्पष्ट केले.

भुयारी मार्ग तरी होणार का?

पुणे-मुंबई मार्गावर हायपर लूप प्रकल्प करण्याचे काही वर्षापूर्वी जाहीर करण्यात आले होते. मात्र, हा हायपरलूप प्रकल्प बारगळला आहे. पुणे शहरातील नदीमधून जलवाहतूक करण्याचे प्रस्तावित करण्यात आले होते. पण, जलवाहतूक देखील कागदावरच राहिली आहे. येरवडा ते कात्रज भुयारी मार्ग तरी होणार का? अशी शंका व्यक्त केली जात आहे.

Story img Loader