पुणे, पिंपरी-चिंचवड, वाकड, थेरगाव, िहजवडी, आकुर्डी, तळेगाव, आळंदी, वाघोली आदी भागातून दिवसाढवळ्या लॅपटॉप व मोबाईल चोरणारा भुरटा व अल्पवयीन चोर पोलिसांच्या जाळ्यात आला आहे. त्याच्याकडून २० महागडे लॅपटॉप व मोबाईल असा सव्वा सहा लाखाचा ऐवज जप्त करण्यात आला. सकाळच्या घाईच्या वेळी दरवाजा उघडा असलेल्या घरांमध्ये घुसून तो चोऱ्या करत असल्याचे उघड झाले.
पोलीस उपायुक्त शहाजी उमाप यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. शुक्रवारी पहाटे थेरगाव गणेशनगर भागात गस्त घालत असताना सहायक पोलीस निरीक्षक दिनेश जगदाळे, सचीन सोनपेटे, भैरोबा यादव यांना १५ वर्षांचा मुलगा संशयास्पदरीत्या फिरत असल्याची माहिती मिळाली. त्याच्याकडे सॅमसंग कंपनीचा महागडा मोबाईल होता. पोलिसांनी त्याची झडती घेतली व चौकशी केल्यानंतर तो असमाधानकारक उत्तरे देऊ लागला. त्याला पोलीस ठाण्यात आणण्यात आले. तेव्हा त्याच्याकडील मोबाईल चोरीचा असल्याचे निष्पन्न झाले. कसून चौकशी केल्यानंतर यापूर्वी केलेल्या चोऱ्या त्याने कबूल केल्या. चोरी केलेला ऐवज त्याने चऱ्होलीतील निवासस्थानी ठेवल्याचे सांगितले. त्यानुसार, त्याच्या घरात १३ लॅपटॉप व १९ मोबाईल सापडले. अन्य ऐवज भोसरीतील ओम रिपेअिरग सेंटरमध्ये दुरूस्तीसाठी दिला होता. हा अल्पवयीन चोर एकटा नसल्याचा संशय व्यक्त करून त्याच्या सहकाऱ्यांचा शोध घेण्यात येईल, असे उमाप यांनी स्पष्ट केले. पुढील तपास दिनेश जगदाळे करत आहेत.

Story img Loader