मानसिक आरोग्याबाबत सल्ला देण्यासाठी राज्य शासनाने सुरू केलेल्या १०४ क्रमांकाच्या हेल्पलाईनवर येणाऱ्या दूरध्वनींपैकी २० टक्के दूरध्वनी मुलांच्या प्रश्नांबाबतचे आहेत. यातही मुलांपेक्षा त्यांच्या पालकांनी केलेल्या दूरध्वनींचीच संख्या अधिक असून मुलांमधील वर्तनसमस्या आणि त्यांना अभ्यासात येणाऱ्या अडचणी पालकांच्या चिंतेचे प्रमुख कारण ठरलेले दिसत आहे.
२६ फेब्रुवारी २०१५ रोजी आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत यांच्या हस्ते या हेल्पलाईनचे उद्घाटन करण्यात आले. १६ एप्रिलपर्यंत या हेल्पलाईनवर मानसिक आरोग्य समस्यांविषयी ७९९ जणांनी दूरध्वनी केले आहेत. दारु, गुटखा आणि तंबाखूचे व्यसन असलेल्यांच्या कुटुंबीयांकडून आलेल्या दूरध्वनींची संख्याही मोठी असून एकूणपैकी २० टक्के दूरध्वनी व्यसनांबाबतचे आहेत. प्रतिदिवशी या हेल्पलाईनवर १८ ते २० दूरध्वनी येत आहेत. आठवडय़ाचे सातही दिवस सकाळी ७ ते रात्री ९ या वेळात ही हेल्पलाईन सुरू असते.
१०४ क्रमांकाची हेल्पलाईन राष्ट्रीय आरोग्य अभियान आणि पिरॅमल स्वास्थ्य यांच्यातर्फे भागीदारीत चालवली जाते. या हेल्पलाईनच्या कार्यकारी प्रमुख नीरजा बनकेर म्हणाल्या, ‘‘लहान आणि पौगंडावस्थेतील मुलांबद्दल आलेले दूरध्वनी प्रामुख्याने या मुलांच्या पालकांकडूनच आले आहेत. मुले नीट अभ्यास करत नाहीत, अभ्यासात रस नाही, त्यांना आकलन जड जाते, लक्षात राहात नाही या समस्या पालक विचारत आहेत. मुलांवर असलेला अभ्यासाचा अति ताण किंवा कधी पालकांकडूनच मुलांकडून ठेवल्या जाणाऱ्या अति अपेक्षा यातून पुढे येत आहेत. काही दूरध्वनी पौगंडावस्थेतील मुलांकडूनही आले आहेत. पण त्यांची संख्या तुलनेने कमी आहे.’’
दारु आणि गुटखा, तंबाखू लागलेले व्यसन यासंबंधी आलेल्या दूरध्वनींची संख्याही २० टक्के आहे. यात व्यसनी व्यक्तींकडून येणाऱ्या दूरध्वनी कमी असून त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींकडून सल्ला मागितला जात आहे. स्त्रियांच्या समस्यांविषयीच्या दूरध्वनींचे प्रमाण १५ टक्के असून त्यात एकटेपणा, नवऱ्याचे व्यसन, घरगुती हिंसा आणि मुलांनी चांगली वागणूक न देणे हे प्रमुख प्रश्न आहेत.
मानसिक आरोग्यासाठीच्या १०४ क्रमांकाच्या हेल्पलाईनवर गेल्या दोन महिन्यांत आलेल्या दूरध्वनींच्या आकडेवारीनुसार प्रमुख समस्यांचे प्रमाण असे :
– लहान आणि पौगंडावस्थेतील मुलांसंबंधीच्या समस्या : २० टक्के
– व्यसनांसंबंधीच्या समस्या : २० टक्के
– स्त्रियांचे प्रश्न : १५ टक्के
– लैंगिक व प्रजननविषयक आरोग्य समस्या : ७ टक्के
– आत्महत्येची प्रवृत्ती : ३ टक्के
– वृद्धांच्या समस्या : ३ टक्के
– करियरविषयक समस्या : ३ टक्के
—–
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा