पिंपरी पालिकेच्या गलथान कारभाराचा आणखी एक नमुना नव्याने उजेडात आला आहे. आकुर्डीतील बहिणाबाई चौधरी प्राणिसंग्रहालयातील सुमारे २० सापांचा रविवारी संशयास्पद मृत्यू झाला आहे. सुट्टीचा दिवस असल्याने नागरिकांची मोठी गर्दी असतानाही फक्त सुरक्षा कर्मचारीच उद्यानात असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणातील दोषींवर कारवाई करण्याची मागणी सर्पमित्रांनी केली आहे.
आकुर्डी येथे महापालिकेचे प्राणिसंग्रहालय आहे. शहरातील विविध भागांत आढळून येणाऱ्या सापांना या ठिकाणी आणून सोडले जाते. मात्र, त्यांची येथे योग्यप्रकारे निगा राखली जात नसल्याच्या तक्रारी यापूर्वीही होत होत्या. तसाच प्रकार पुन्हा घडल्याने या सापांचा मृत्यू झाल्याचा आरोप होत आहे. घोणस, नाग, धामण, दिवड, तस्कर जातीच्या सापांच मृतांमध्ये समावेश आहे. रविवार असल्याने नेहमीचे कर्मचारी कामावर नव्हते. फक्त सुरक्षा कर्मचारीच होते. नागरिकांची मोठी गर्दी होती. या वेळी प्राणिसंग्रहालयातील साप काहीच हालचाल करत नसल्याचे नागरिकांच्या तसेच सर्पमित्रांच्या लक्षात आले. त्यांनी हा प्रकार उघड केला. त्यानंतर एकच खळबळ उडाली. दरम्यान, या सर्पोद्यानातील भोंगळ कारभाराला जुनी परंपरा आहे. येथे आणल्या जाणाऱ्या पशु-प्राण्यांची योग्यप्रकारे निगा राखली जात नाही, अशा तक्रारी नेहमीच होतात. येथील ‘किंग क्रोबा’ चोरीला गेल्याचे प्रकरण चांगलेच गाजले होते. त्यानंतरही असे प्रकार होतच आहेत. आता सापांच्या मृत्यूमुळे या विभागातील गैरकारभार नव्याने पुढे आला आहे. दोषींवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
यापुढे असे होणार नाही
नागरिक व सर्पमित्र साप आणून देत असतात. सापांची संख्या जास्त झाल्यास बंदिस्त पेट्यांमध्ये त्यांना ठेवावे लागते. साप जास्त झाले तरी ते सांभाळण्याची जबाबदारी पालिकेची आहे, ती नाकारता येणार नाही. यापुढे असे प्रकार होणार नाहीत, याची खबरदारी घेतली जाईल.
डॉ. सतीश गोरे, पशुवैद्यकीय अधिकारी, पिंपरी-चिचंवड पालिका
आकुर्डीतील सर्पोद्यानात २० सापांचा संशयास्पद मृत्यू
घोणस, नाग, धामण, दिवड, तस्कर जातीच्या सापांच मृतांमध्ये समावेश आहे.
Written by लोकसत्ता टीम
Updated:
आणखी वाचा
First published on: 20-11-2016 at 22:12 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 20 snake dead at akurdi zoo