पुणे : बेदाणा उत्पादनाचा हंगाम ऐन जोमात असतानाच दर्जेदार द्राक्षांअभावी बेदाणा उत्पादन घटले आहे. दर वर्षी एप्रिलच्या अखेरपर्यंत होणारे बेदाणा उत्पादन, यंदा जेमतेम मार्चअखेरपर्यंतच सुरू राहून, एकूण बेदाणा उत्पादनात २० हजार टनांनी घट होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे बेदाण्याच्या दरातील पडझडीमुळे शेतकऱ्यांची निराशा झाली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सततचा अवकाळी पाऊस आणि ढगाळ हवामानामुळे द्राक्षांवर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढला होता. द्राक्ष मण्यांना तडे गेल्यामुळे आणि फळमाशीमुळे घडकूज झाली होती. द्राक्ष घडावर करपा रोगाचे काळे डाग पडले होते. अवकाळीचा फटका बसल्यामुळे द्राक्षांची टिकवणक्षमताही कमी झाली होती. परिणामी यंदाच्या हंगामात द्राक्षाचा दर्जाही काहीसा घसरला होता. त्यामुळे जानेवारीपासून म्हणजे हंगामाच्या सुरुवातीपासूनच बेदाणा निर्मितीसाठी द्राक्षाची टंचाई भासू लागली होती. दर वर्षी मार्च महिन्यात हंगाम ऐन बहरात असतो. पण, यंदा मार्च महिन्यातच बेदाणानिर्मिती थंडावली आहे. दर वर्षी एप्रिलअखेरपर्यंत हंगाम चालतो. यंदा मार्चच्या अखेरीपर्यंत चालेल, अशी शक्यता माहिती कवठेमहांकाळ येथील द्राक्षउत्पादक दिनकर गुजले यांनी दिली.

हेही वाचा >>> अष्टविनायकांचे दर्शन २४ तासांत होणार

मागील काही वर्षांपासून प्रामुख्याने महाराष्ट्रात आणि कर्नाटकच्या सीमा भागात सरासरी दोन लाख टन बेदाण्याची निर्मिती होती. मागील वर्षाच्या हंगामात उच्चांकी दोन लाख ७० हजार टन बेदाण्याचे उत्पादन झाले होते. जानेवारी ते एप्रिल, असा चार महिने चालणारा हंगाम यंदा फक्त तीन महिनेच चालेल आणि बेदाणा उत्पादनात सरासरी वीस टक्क्यांनी घट होऊन एकूण बेदाणा उत्पादनात सरासरी २० हजार टनांनी घट होण्याचा अंदाज, तासगाव येथील बेदाणा उत्पादक प्रशांत जाधव यांनी व्यक्त केला आहे.

शेतकऱ्यांनी बेदाणा विक्री थांबविली

तासगाव परिसरात उत्पादित झालेल्या दर्जेदार बेदाण्याला हंगामाच्या सुरुवातीस सरासरी २०० ते २७० रुपयांपर्यंत दर मिळतो. यंदाच्या हंगामात सुरुवातीपासूनच दर्जानिहाय १३० ते २३० रुपये प्रति किलो दर शेतकऱ्यांना मिळत आहे. एकीकडे द्राक्ष उत्पादन आणि बेदाणानिर्मितीचा दर वाढला आहे. त्या तुलनेत बेदाण्याला चांगला दर मिळताना दिसत नाही. अपेक्षित दर न मिळाल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी बेदाणानिर्मिती टाळून मिळेल त्या दराने किरकोळ बाजारात द्राक्ष विक्री केली आहे. दरात पडझड झाल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी बेदाणा विक्री थांबवून, आपला बेदाणा शीतगृहात साठवणूक करण्यास प्राधान्य दिले आहे. दर वर्षी होळीच्या पार्श्वभूमीवर बेदाणा दरात येणारी तेजी यंदा दिसून आली नाही.

हेही वाचा >>> पुणे-मुंबईदरम्यान रेल्वेसेवा विस्कळीत; लोणावळ्यानजीक तांत्रिक बिघाडाचा फटका 

दरात घसरणीमुळे शेतकरी अडचणीत

मागील हंगामाच्या प्रारंभी दर्जेदार बेदाण्याला प्रतिकिलो २०० ते २५० रुपये दर मिळला होता. यंदा हंगामाच्या मध्यावरही जेमतेम १३० ते २३० रुपये दर मिळत आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे द्राक्ष उत्पादन, बेदाणा निर्मितीचा खर्च वाढला आहे. उत्पादन खर्चाच्या तुलनेत दरवाढ मिळणे अपेक्षित असताना, प्रत्यक्षात बेदाण्याला मिळणाऱ्या दरात घट झाली आहे. हंगामाच्या सुरुवातीलाच दर मिळाले नसल्याने यंदा बेदाणानिर्मितीत घट झाली आहे, अशी माहिती आगळगाव (ता. कवठे महांकाळ) येथील बेदाणा उत्पादक तानाजी पाटील यांनी दिली.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 20 thousand tons raisin production likely to drop due to lack of quality grapes pune print news dbj 20 zws