पिंपरी : महिनाभरापूर्वी मावळातील परंदवाडी येथे आढळून आलेल्या दुर्मिळ जातीच्या कासवाची २२ अंडी वन्यजीव रक्षक मावळ संस्थेच्या सदस्यांनी रेस्क्यू करून कृत्रिमरित्या उबवण्यासाठी ठेवली होती. या अंड्यांमधून सोमवारी २० पिल्लांनी जन्म घेतला. या सर्व कासवांना वन अधिकार्‍यांच्या उपस्थितीत निसर्गाच्या सानिध्यात मुक्त करण्यात आले.मावळ तालुक्यातील परंदवाडी येथे हरी बोल नर्सरीजवळ ७ मार्च रोजी कासवाची २२ अंडी मिळून आली. याची माहिती दिपक महाजन यांनी वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे सभासद निनाद काकडे यांना कळवली. काकडे आणि अनुभव रणपिसे यांनी अंडी ती रेस्क्यू करून कृत्रिमरित्या उबवण्यासाठी ठेवली होती.

हे कासव वन्यजीव संरक्षण कायदा १९७२ मधील दुर्मिळ जातीचे आहे. ७ एप्रिल रोजी या अंड्यातून २० पिल्ले बाहेर आली. दोन अंडी ही नापीक निघाली. २० पिल्लांची प्राथमिक पाहणी वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे संस्थापक निलेश गराडे, जिगर सोलंकी, निनाद काकडे आणि वनविभाग वडगावचे वनरक्षक योगेश कोकाटे यांनी केली.

सर्व पिल्ले हे स्वस्थ असून त्यांना वडगाव मावळचे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रकाश शिंदे, वनपाल एम. हिरेमठ व वनरक्ष योगेश कोकाटे यांच्या मार्फत निसर्गाच्या सानिध्यात मुक्त करण्यात आले. कासव हे पर्यावरणीय संतुलन टिकवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे प्राणी आहेत. ते जलीय पर्यावरणाची स्वच्छता राखण्यात मदत करतात. तसेच, अन्नसाखळीतील विविध स्तरांचा भाग असतात. कासव प्रजातींच्या संवर्धनासाठी आणि परिसंस्थेतील जैवविविधतेसाठी अनमोल वाटा आहे. कोणताही वन्यप्राणी जखमी अवस्थेत आढळून आल्यास जवळपासच्या प्राणीमित्रला किंवा वनविभागला संपर्क (१९२६) करावा, असे आवाहन वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे संस्थापक निलेश गराडे आणि अध्यक्ष अनिल आंद्रे यांनी केले आहे.

”मावळ तालुक्यात या जातीचे कासव खूप जास्त प्रमाणात आढळून येतात. सॉफ्टशेल टर्टल मधील एकच असा कासव आहे जो फक्त हिंदुस्थानातच आढळून येतो. भारतीय कोणताही कासव पाळण्यात सक्त मनाई आहे. त्यांच्या संरक्षणासाठी प्रयत्न करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. कोणताही जखमी वन्य प्राणी आढळल्यास त्वरित वनविभागाला कळवावे, असे आवाहन वडगाव मावळ विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रकाश शिंदे यांनी केले.