पिंपरी : मुळा नदी पुनरूज्जीवन प्रकल्पासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेने पहिल्या कर्जरोख्याद्वारे २०० कोटी रुपये मिळविले आहेत. या प्रकल्पांसाठी गुंतवणूकदारांकडून ३१५ कोटी रुपयांच्या बोलीसह उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. नदी पुनरुज्जीवन प्रकल्पातंर्गत वाकड बायपास ते सांगवी पुलापर्यंत मुळा नदीच्या विकासासाठी हा निधी खर्च करण्याची महापालिकेची योजना आहे. दरम्यान, महापालिकेच्या कोट्यवधी रुपयांची बचत ठेवी असताना कर्जरोखे उभारले आहे.
पिंपरी-चिंचवड आणि पुणे महापालिका हद्दीतून मुळा नदी वाहते. दोन्ही महापालिका हद्दीत या नदीची एकूण लांबी ४४.४० किलोमीटर इतकी आहे. पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीलगत मुळा नदीच्या काठाची लांबी सुमारे १४.२० किलोमीटर इतकी आहे. या भागात पिंपळे-निलख येथील संरक्षण विभागाची जागा आणि दापोडी येथील लष्करी अभियांत्रिकी महाविद्यालयाचा (सीएमई) अंतर्भाव आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातून वाहणाऱ्या मुळा नदीचे पुनरूज्जीवन दोन्ही महापालिका स्वतंत्रपणे करणार आहेत.
हेही वाचा >>> पुणे मेट्रोला हिरवा कंदील! पंतप्रधान मोदींच्या हस्ते केवळ उद्घाटनाची औपचारिकता
वाकड बायपास ते स्पायसर कॉलेज-सांगवी पूल असे डाव्या बाजूचे ८.८० किलोमीटर अंतराचे काम पिंपरी महापालिका करणार आहे. तर, उजव्या बाजूचे काम पुणे महापालिका करणार आहे. पिंपरी महापालिकेने मुळा नदीच्या विकासासाठी २०० कोटींचे कर्ज उभारले आहे. महापालिकेने ८.१५ टक्के दराने २०० कोटी रुपयांची रक्कम कर्जरोख्याद्वारे जारी केली. त्यामुळे केंद्र सरकारकडून २६ कोटी रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान मिळण्यास महापालिका पात्र ठरली आहे. कर्जरोख्यामुळे उत्कृष्ट वित्तीय व्यवस्थापन, शहरी पायाभूत सुविधांवरील मागणी वाढत असताना महापालिकांना वित्त पुरवठ्यासाठी पर्यायी मार्ग म्हणून आगामी काळामध्ये कर्जरोखे महत्वपूर्ण ठरतील, असे आयुक्त शेखर सिंह यांनी सांगितले.
महापालिकेचे उत्कृष्ट वित्तीय व्यवस्थापन, आर्थिक शिस्त यामुळे कर्जरोखे यशस्वीरित्या उभारण्यास मदत झाली आहे. कर्जरोख्यामुळे प्रकल्पांना वित्तपुरवठा करण्यासाठी नवीन पर्यायी मार्ग खुले होत आहेत.– जितेंद्र कोळंबे, मुख्य लेखा आणि वित्त अधिकारी, पिंपरी-चिंचवड महापालिका