जिल्ह्यातील ६१ ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया सुरू असून त्यातील पाच ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. तर, एका ग्रामपंचायतीसाठी एकही अर्ज आलेला नाही. परिणामी सरपंच पदांच्या ५५ जागांसाठी २१० उमेदवार रिंगणात आहेत. सरपंच आणि सदस्य पदासाठी १८ सप्टेंबर रोजी मतदान होणार असून १९ सप्टेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.
हेही वाचा >>> पिंपरी : शिरूर लोकसभेतील प्रलंबित प्रश्न सोडवू ; केंद्रीयमंत्री रेणूका सिंह यांची ग्वाही
ग्रामपंचायत सरपंचपदाची निवड थेट मतदारांतून होणार आहे. जिल्ह्यातील ६१ ग्रामपंचयातींच्या सरपंच पदांसाठी ३१५ जणांनी अर्ज केला होता. त्यातील १०३ जणांनी माघार घेतली, तर दोघांचा अर्ज बाद झाला होता. पाच ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. त्यामध्ये खेड आणि आंबेगाव तालुक्यातील प्रत्येकी एक, तर जुन्नर तालुक्यातील तीन ग्रामपंचायतींचा समावेश आहे.
हेही वाचा >>> पुणे : चांदणी चौक पूल पाडल्यानंतरच्या वाहतुकीचे नियोजन
दरम्यान, जिल्ह्यातील खेड चार, भोर दोन, जुन्नर ३३ आणि आंबेगाव १६ ग्रामपंचायतींसाठी मतदान होणार आहे. तालुक्यातील ५५ ग्रामपंचायतीमधील सदस्यांच्या ४८५ जागांसाठी निवडणूक होत असून त्यातील २४० जागा बिनविरोध झाल्या आहेत. त्यामुळे आता २४५ सदस्यांसाठी मतदान होणार आहे. विशेष म्हणजे सदस्यांच्या १६ जागांसाठी एकही अर्ज आलेला नाही, असे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या ग्रामपंचायत शाखेकडून सांगण्यात आले.