पिंपरी : सरत्या आर्थिक वर्षात पिंपरी-चिंचवड महापालिकेला मिळकतकर, बांधकाम परवानगी, अग्निशामक, पाणीपुरवठा, आकाशचिन्ह व परवाना, भूमी जिंदगी, प्राधिकरण भूखंड हस्तांतर, स्थानिक संस्था कर या विभागातून दोन हजार १०९ कोटी २३ लाखांचा महसूल मिळाला आहे.
कर आकारणी व कर संकलन हा विभाग महापालिकेच्या उत्पन्नाचा मुख्य स्रोत आहे. त्यानंतर बांधकाम परवानगी विभाग, अग्निशमन, आकाशचिन्ह व परवाना विभागातून महापालिकेला माेठ्या प्रमाणात महसूल मिळताे. कर संकलन व कर आकारणी विभागाला एक हजार ७५ काेटींचे उद्दिष्ट देण्यात आले हाेते. मालमत्तांचे ड्राेन सर्वेक्षण, मालमत्ता लाखबंद, जप्ती, नळजाेड खंडित करणे यांसह विविध उपाययाेजनांमुळे सहा लाख ३० हजार २९४ मिळकतधारकांपैकी पाच लाख दोन हजार, तर नव्याने नाेंदणी झालेल्या ६० हजार ७२ मिळकतधारकांनी ९६५ काेटी ७१ लाख रुपयांचा करभरणा केला असल्याचे सहायक आयुक्त अविनाश शिंदे यांनी सांगितले.
बांधकाम परवानगी विभागास ८८१ कोटी ३१ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत हे उत्पन्न ७७ कोटी रुपयांनी अधिक आहे. तर, अग्निशमन विभागास १५० काेटींचे उद्दिष्ट देण्यात आले हाेते. या विभागाला १६३ कोटी चार लाख रुपयांचे उत्पन्न प्राप्त झाले आहे. अग्निशमन परवाना (ना हरकत दाखल), अग्निशमन लेखापरीक्षण, इतर शुल्कांतून हे उत्पन्न तिजोरीत जमा झाल्याचे उपायुक्त मनोज लोणकर यांनी सांगितले.
पाणीपट्टीची ७६ काेटी ४१ लाख रुपये इतकी वसुली झाली आहे. गतवर्षापेक्षा एक काेटी ८५ लाख रुपयांनी पाणीपट्टीची वसुली कमी झाली आहे. महापालिका जागेत तसेच, खासगी जागेत उभारण्यात आलेल्या जाहिरात होर्डिंगचा परवाना आणि नूतनीकरणातून आकाशचिन्ह व परवाना विभागास २० कोटी ३५ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. गेल्या अनेक वर्षांतील हे सर्वाधिक उत्पन्न आहे. त्याचबराेबर प्राधिकरणाचे भूखंड हस्तांतर शुल्क, वारसनाेंद आणि भूमी व जिंदगी विभागातून १२ कोटी ७४ लाख रुपयांचा महसूल महापालिका तिजोरीत जमा झाल्याचे सहायक आयुक्त मुकेश काेळप यांनी सांगितले.
झोपडपट्टी निर्मूलन व पुनर्वसन विभागातून ४५ लाख ५४ हजार रुपयांचे उत्पन्न मिळाल्याचे उपायुक्त अण्णा बोदडे यांनी सांगितले. तर, स्थानिक स्वराज्य संस्था कर (एलबीटी) विभागातून १५ लाख ८१ हजार रुपयांचे उत्पन्न मिळाल्याचे उपायुक्त सीताराम बहुरे यांनी सांगितले.