दागिन्यांचे मूल्यांकन करणाऱ्याशी संगनमत करुन बनावट सोन्याचे दागिने तारण ठेवून अहमदनगर शहर सहकारी बँकेची २२ लाख ७८ रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी कोथरुड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. नगरमध्येद बनावट सोने तारण घोटाळ्याचे प्रकरण उघडकीस आले आहे.
या प्रकरणी अहमदनगर शहर सहकारी बँकेत मूल्यांकन करणारे अजित प्रभाकर कुलकर्णी यांच्यासह मारुती शिवाजी सुर्यवंशी, सुनील रघुनाथ कदम, वैजयंती सुनील कदम, केतन विलास अमराळे, सनी देवीदास बलकवडे यांच्या विरोधात फसवणूक, बनावट कागदपत्रे तयार करणे आदी कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या बाबत बँकेच्या शाखाधिकाऱ्यांनी कोथरूड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार १० नोव्हेंबर २०२० ते १६ नोव्हेंबर २०२१ दरम्यान बँकेच्या कोथरूड शाखेत घडला.
हेही वाचा : पुण्याला वर्षभर पुरणारे पाणी नदीत सोडले ; मुठा नदीत ६८४८ क्युसेकने विसर्ग
बँकेत मूल्यांकन करणारे (गोल्ड व्हॅल्युअर) अजित कुलकर्णी यांच्याशी आरोपींनी संगनमत केले. आरोपींनी त्यांच्याकडील बनावट सोन्याचे दागिने खरे असल्याबाबत प्रमाणपत्र तयार केले. या प्रमाणपत्राच्या आधारे बनावट सोन्याचे दागिने बँकेकडे तारण ठेवून २२ लाख ७८ हजार रुपयांचे कर्ज काढून बँकेची फसवणूक केली, असे फिर्यादीत नमूद आहे. दागिने बनावट असल्याचे आढळून आल्यावर बँकेने पोलिसांकडे तक्रार दिली. पोलिस उपनिरीक्षक सावळे तपास करत आहेत.