लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे : विवाहाच्या आमिषाने तरुणाची २२ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी तरुणीसह दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. गायत्री आणि जय भगवान रोकडे (दोघे रा. संगमनेर, जि. नगर) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत एका तरुणाने लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
तक्रारदार ३० वर्षीय तरुण नगर रस्त्यावरील वाघोलीत राहायला आहे. आरोपी गायत्री आणि तरुणाची ओळख समाजमाध्यमातून झाली होती. त्यांच्यातील संवाद वाढल्यानंतर तरुणीने त्याच्यापुढे विवाहाचा प्रस्ताव ठेवला. तरुणाला जाळ्यात ओढून त्याच्याकडे आर्थिक अडचण असल्याचे सांगितले. कौटुंबिक समस्या, नातेवाईकांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केल्याचे सांगत तिने त्याच्याकडून वेळोवेळी ऑनलाइन पद्धतीने २२ लाख रुपये उकळले.
आणखी वाचा-ठाकरे सरकारच्या काळात राज्य पिछाडीवर! उद्योमंत्री उदय सामंत यांची टीका
तरुणाला आर्थिक अडचण आल्याने त्याने तिला काही रक्कम परत करण्याची विनंती केली. त्यानंतर तिने तरुणाला उडवाउडवीचे उत्तरे दिली. तिने तिचा मोबाइल क्रमांक बंद केला. फसवणूक झाल्याचे उघडकीस आल्यानंतर तरुणाने पोलिसांकडे तक्रार दिली. सहायक पोलीस निरीक्षक टापरे तपास करत आहेत.