पुणे : राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागाला पुणे, पिंपरी-चिंचवड आणि उर्वरित ग्रामीण भागातून सरलेल्या आर्थिक वर्षात तब्बल २२२४.८२ कोटींचा महसूल प्राप्त झाला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा ३६९.८२ कोटींनी अधिक महसूल प्राप्त झाला आहे. तसेच वर्षभरात विभागाकडून २६५८ गुन्हे दाखल केले असून त्यामध्ये २९४७ आरोपींना अटक केली आहे. या कारवाईत १८ कोटी १४ लाख १९ हजार १७७ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गोवा राज्यातून उत्पादन शुल्क बुडवून अवैधरित्या महाराष्ट्रात वाहतूक केल्याप्रकरणी गेल्या वर्षभरात २१ गुन्हे दाखल करून ४२ आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यामध्ये १९ वाहने जप्त केली असून आठ कोटी ६४ लाख ४५ हजार १६९ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अवैधरित्या ढाब्यांवर मद्य सेवन केल्याप्रकरणी १३४ प्रकरणांची नोंद करण्यात आली असून न्यायालयाकडून २९० आरोपींना दोषी ठरवून शिक्षा किंवा दंड ठोठावण्यात आला आहे. संबंधितांकडून तीन लाख ९६ हजार ९०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. दरम्यान, महाराष्ट्र दारुबंदी कायदा १९४९ चे कलम ९३ अंतर्गत प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून दोन किंवा त्यापेक्षा अधिक गुन्ह्यांची नोंद असलेल्या सराईत आरोपीविरुद्ध चांगल्या वर्तणुकीचे बंधपत्र घेण्यासाठी एकूण ३२० प्रस्ताव सक्षम दंडाधिकारी यांच्याकडे सादर करण्यात आले. त्यापैकी १२० आरोपींकडून चांगल्या वर्तणुकीचे बंधपत्र घेण्यात आले आहे, अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागाचे अधीक्षक सी. बी. राजपूत यांनी दिली.

हेही वाचा – सिंहगड रस्ता परिसरात कोयता गँगची दहशत; अल्पवयीन मुलांसह तिघांवर वार

बिअरच्या विक्रीत सर्वाधिक वाढ

पुणे जिल्ह्यात सन २०२१-२२ या वर्षापेक्षा सन २०२२-२३ या वर्षात देशी मद्य, बिअर आणि वाइनच्या विक्रीत वाढ झाली आहे. गेल्या वर्षीची तुलना करता सरत्या आर्थिक वर्षात देशी मद्यविक्रीत १५ टक्के, विदेशी मद्यविक्रीत २३ टक्के, तर बिअर विक्रीत ५१ टक्के, तर वाइन विक्रीमध्ये ३१ टक्के वाढ झाली आहे. सन २०२२-२३ या आर्थिक वर्षात २२२४.८२ कोटींचा महसूल प्राप्त झाला आहे. सन २०२१-२२ मध्ये १८५५.८२ कोटींचा महसूल प्राप्त झाला होता. म्हणजेच सरलेल्या आर्थिक वर्षात तब्बल ३६९.८२ कोटींनी अधिक महसूल प्राप्त झाला आहे.

हेही वाचा – खडकवासला ते फुरसुंगी बोगद्याला ‘हिरवा कंदील’; तांत्रिक समितीची मान्यता

अवैध मद्यनिर्मिती, वाहतूक आणि विक्री यांबाबत नियमित कारवाई सुरू राहणार आहे. शहरासह जिल्ह्यात कोणत्याही नागरिकास अवैध मद्यनिर्मिती, वाहतूक व विक्री याबाबत माहिती मिळाल्यास टोल फ्री क्रमांक १८००२३३९९९९ आणि दूरध्वनी क्रमांक ०२०-२६०५८६३३ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन अधीक्षक राजपूत यांनी केले आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 2224 crore revenue from liquor sales in pune pune print news psg 17 ssb