पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरामध्ये गेल्या चार महिन्यांत डेंग्यूचे २२९ रुग्ण आढळले आहेत. त्यातील ऑक्टोबरमध्ये ८१ जणांना डेंग्यूची लागण झाली असून, गेल्या चार महिन्यांत ऑक्टोबरमधील रुग्णवाढ अधिक आहे.
शहरात जूनमध्ये एकही डेंग्यूचा रुग्ण आढळला नाही. मात्र, गेल्या चार महिन्यांत नऊ हजार ४४४ संशयित रुग्णांची तपासणी केल्यानंतर २२९ डेंग्यूचे रुग्ण आढळले आहेत. त्यात जुलैमध्ये एक हजार ४३२ संशयित रुग्णांची तपासणी केल्यानंतर ३६, ऑगस्टमध्ये दोन हजार १४५ रुग्णांची तपासणी केली असता ५२, सप्टेंबरमध्ये दोन हजार ३२७ रुग्णांची तपासणी केल्यानंतर ६०, तर ऑक्टोबरमध्ये दोन हजार ४३८ संशयित रुग्णांची तपासणी केल्यानंतर तब्बल ८१ जणांना डेंग्यूची लागण झाल्याचे समोर आले.
हेही वाचा – पिंपरी, आकुर्डीतील ९३८ सदनिकांच्या सोडतीचा मार्ग मोकळा, राज्य सरकारने घेतला ‘हा’ निर्णय
पावसाळ्यात पाणी साचून राहून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. त्यामुळे सर्वसाधारणपणे पावसाळ्यात डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ होते. आता पाऊस संपला असताना डेंग्यूच्या रुग्णांची संख्याही कमी होण्याची शक्यता वैद्यकीय विभागाने व्यक्त केली.
मलेरियाचे १७ रुग्ण
जानेवारी ते ऑक्टोबर या कालावधीत शहरातील एक लाख २० हजार ३७२ तापाच्या रुग्णांची तपासणी करण्यात आली. त्यात १७ मलेरियाचे रुग्ण आढळून आले. एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही.
हेही वाचा – अमली पदार्थ तस्कर ललित पाटीलकडून पाच किलो सोने जप्त
पावसाळ्यात डेंग्यूचे रुग्ण वाढतात. आता पाऊस संपला आहे. त्यामुळे डेंग्यूच्या रुग्ण संख्येत घट होईल. – डॉ. लक्ष्मण गोफणे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी, पिंपरी-चिंचवड महापालिका