पुणे : मागील काही दिवसांपासून जगावर मंदीचे सावट आहे. यामुळे अनेक बडय़ा कंपन्यांकडून कर्मचारी कपातीचे सत्र सुरू आहे. मात्र, नवउद्यमींकडूनही (स्टार्टअप) वर्षभरापासून रोजगार कपात होत असल्याचे समोर आले आहे. देशातील ८२ नवउद्यमींकडून २३ हजारहून अधिक कर्मचाऱ्यांना कमी करण्यात आले आहे.
‘इन्क ४२’ या संकेतस्थळाने याबाबत अहवाल जाहीर केला आहे. नवउद्यमींकडून मोठय़ा प्रमाणात कर्मचारी कपात सुरू असून, भविष्यात ती वाढत जाणार आहे. शिक्षण तंत्रज्ञान क्षेत्रातील १९ नवउद्यमींनी ८ हजार ४६० कर्मचाऱ्यांना घरी पाठवले आहे. त्यामध्ये चार युनिकॉर्न (एक अब्ज डॉलरपेक्षा अधिक मूल्य असलेले) नवउद्यमींचाही समावेश आहे. कर्मचारी कपात करणाऱ्या नवउद्यमींमध्ये बैजूज, ओला, ओयो, मीशो, एमपीएल, लिव्हस्पेस, इनोव्हॅक्सर, उडाण, अनअॅकॅडमी आणि वेदांतू यासह इतरांचा समावेश आहे.
घरांची अंतर्गत सजावट आणि नूतनीकरण क्षेत्रातील लिव्हस्पेस कंपनीने चालू आठवडय़ात शंभर कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले. यासाठी कंपनीने खर्च कपातीचे कारण दिले. गेल्या आठवडय़ात ऑनलाईन स्टोअर प्लॅटफॉर्म दुकान कंपनीने ३० टक्के कर्मचाऱ्यांची कपात केली. सहा महिन्यांत कंपनीने दुसऱ्यांदा कर्मचारी कमी केले आहेत. आरोग्य क्षेत्रातील युनिकॉर्न प्रिस्टिन केअर कंपनीने विविध विभागांमधील ३५० कर्मचाऱ्यांना घरी पाठवले आहे. विक्री, तंत्रज्ञान आणि उत्पादन विभागांतील कर्मचाऱ्यांची संख्या यात जास्त आहे.
ऑनलाईन उच्च शिक्षण देणाऱ्या अपग्रॅड कंपनीने आपल्या उपकंपनीतील ३० टक्के कर्मचाऱ्यांची कपात केली आहे. वितरण व्यवस्थापन क्षेत्रातील फारआय कंपनीने फेब्रुवारी महिन्यात ९० कर्मचाऱ्यांची कपात केली. कंपनीने आठ महिन्यात दुसऱ्यांदा कर्मचारी कपात केली आहे. सोशल मीडिया क्षेत्रातील शेअर चॅट कंपनीने बाजारपेठेतील अस्थिरतेचे कारण देत २० टक्के कर्मचाऱ्यांना कमी केले आहे. कंपनीने एकूण ५०० कर्मचाऱ्यांची कपात केली आहे.