शहराच्या विविध भागामध्ये नागरिकांना कोणत्याही वेळेला पेट्रोल व डिझेल उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने भारत पेट्रोलियम २४ तास सुरू राहणाऱ्या पेट्रोल पंपांची संख्या वाढविणार आहे. त्याचप्रमाणे सीएनजी पंपांची संख्या वाढविण्यावरही कंपनीकडून भर देण्यात येणार आहे.
भारत पेट्रोलियमने पुणे व पिंपरी- चिंचवडमधील पेट्रोल पंपांवर राबविलेल्या ‘फ्यूअल हंगामा’ या योजनेतील बक्षीस वितरण सोमवारी झाले. त्यानिमित्ताने घेतलेल्या पत्रकार परिषदेत कंपनीचे विभागीय व्यवस्थापक इंद्रजित सिंग व इतर अधिकाऱ्यांनी कंपनीच्या विविध योजनांची माहिती दिली. २४ तास सुरू राहणाऱ्या पंपांविषयी ते म्हणाले, सध्या भारत पेट्रोलियमचे सुमारे आठ पंप २४ तास खुले असतात. त्यात आरटीओ समोरील पंप, नवी पेठ, कोथरूड येथील कासट पेट्रोलियम, हिंजवडी, वाल्हेकरवाडी, कोंढवा आदी ठिकाणच्या पंपांचा समावेश आहे. मात्र, नागरिकांची गरज लक्षात घेता, येत्या काही दिवसांत २५ टक्के पेट्रोल पंप २४ तास खुले ठेवण्याचे नियोजन आहे. सीएनजी पंपांची संख्याही वाढविण्याचे नियोजन आहे. त्यात काही ठिकाणी ऑनलाईन पंप सुरू करण्यासाठी प्रस्ताव दिले आहेत.
ग्राहकांना गुणवत्तापूर्ण सुविधा मिळण्यासाठी अत्याधुनिक तंत्राचा वापर असलेल्या पंपांची संख्याही वाढविण्यात येत आहे. सध्या बहुतांश पंपावर आधुनिक यंत्रणा बसविण्यात आली आहे. पेट्रोल संपल्याचे सांगून ते देण्यास नकार मिळाल्यास ग्राहक स्वत: पंपावरील साठा पंपावरील एका यंत्राद्वारे तपासून पाहू शकतो. त्याचप्रमाणे प्रामुख्याने चारचाकी वाहनांबाबत संबंधित मालकाने नोंदणी केल्यास त्याच्या वाहनात भरण्यात येणाऱ्या इंधनाची माहिती त्याला ‘एसएमएस’द्वारे मिळू शकते. ऑटो तिकिटींग पद्धतीमध्ये इंधनाची अचूक पावती मिळू शकते. त्याचप्रमाणे या पद्धतीत इंधनाचे पैसे बँकेच्या स्वाईप कार्डमधून द्यायचे झाल्यास इंधन भरलेल्या रकमेपेक्षा अधिक पैसे जाणार नाहीत, अशी व्यवस्था करण्यात आली आहे. शहरातील पंपांनंतर आता ग्रामीण भागातील पंपांवरही या यंत्रणा बसविण्याचे नियोजन असल्याचे सिंग यांनी सांगितले.

Story img Loader