पुणे : डॉक्टरांच्या सुरक्षिततेच्या मुद्द्यावर इंडियन मेडिकल असोसिएशनने २४ तासांसाठी पुकारलेल्या संपामुळे शहरातील खासगी रुग्णालयांमधील बाह्यरुग्ण विभाग (ओपीडी) शनिवारी बंद राहिले. खासगी रुग्णालयांमध्ये अत्यावश्यक सेवा वगळता इतर सेवा बंद राहिल्याने रुग्णांची गैरसोय झाली. यामुळे सरकारी रुग्णालयांमध्ये रुग्णांची गर्दी दिसून आली.

कोलकत्यातील वैद्यकीय महाविद्यालयात महिला निवासी डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याच्या घटनेचे देशभरात संतप्त पडसाद उमटत आहेत. डॉक्टरांच्या सुरक्षिततेच्या मुद्द्यावर देशभरातील वैद्यकीय महाविद्यालयांतील निवासी डॉक्टरांनी पाच दिवसांपासून संप केला आहे. या आंदोलनाला पाठिंबा दर्शवित इंडियन मेडिकल असोसिएशनसह (आयएमए) सर्व डॉक्टर संघटना, हॉस्पिटल संघटनांनी २४ तासांचा संप पुकारला. सर्व डॉक्टरांनी अत्यावश्यक वगळता इतर वैद्यकीय सेवा शनिवारी सकाळी सहा ते रविवारी सकाळी सहापर्यंत बंद ठेवली आहे.

आणखी वाचा-काही लोकांनी ‘तो’ विषय राजकीय करून टाकला : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

डॉक्टरांच्या संपामुळे शहरातील खासगी रुग्णालयांतील बाह्यरुग्ण विभाग शनिवारी बंद राहिले. या संपामुळे अनेक रुग्णांचे हाल झाले. खासगी डॉक्टर आणि खासगी रुग्णालये बंद असल्याने रुग्णांना सरकारी रुग्णालयात जावे लागले. यामुळे सरकारी रुग्णालयांत आज मोठी गर्दी दिसून आली. काही रुग्णांना रोज डॉक्टरांकडून उपचार आवश्यक असतात. अशा रुग्णांना ऐनवेळी सरकारी रुग्णालयांचा रस्ता धरावा लागला. त्यामुळे अनेक रुग्णांना गैरसोय झाल्याची तक्रार केली.

डॉक्टरांचा संप यशस्वी झाल्याचा दावा आयएमएसह सर्व डॉक्टर संघटनांनी केला आहे. बाह्यरुग्ण विभाग आणि नियमित सेवा बंद ठेवण्याचे आवाहन आयएमएने केले होते. या आवाहनाला सर्व डॉक्टर आणि रुग्णालयांनी प्रतिसाद दिल्याने संप यशस्वी झाला. केंद्रीय संरक्षण कायदा करावा आणि रुग्णालये संरक्षित क्षेत्रे जाहीर करावीत, अशी आमची मागणी आहे, असे आयएमए पुणे शाखेचे अध्यक्ष डॉ. राजन संचेती आणि हॉस्पिटल बोर्ड ऑफ इंडिया पुणे शाखेचे अध्यक्ष डॉ. संजय पाटील यांनी सांगितले.

आणखी वाचा-गुजरातमधील अमली पदार्थ तस्कर अटकेत, अमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई

मोठ्या रुग्णालयांचाही सहभाग

शहरातील मोठ्या खासगी रुग्णालयांनी या संपात सहभाग नोंदविला. काही रुग्णालयांमध्ये डॉक्टरांनी आंदोलन केले. यात पूना हॉस्पिटल, भारती विद्यापीठ वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, रूबी हॉल क्लिनिक यांचा समावेश आहे. सह्याद्री हॉस्पिटल, जहांगिर हॉस्पिटल, नोबल हॉस्पिटल या रुग्णालयांमधील बाह्यरुग्ण विभाग बंद ठेवण्यात आले.