पुणे : एखाद्या रेल्वे प्रवाशाला तातडीची वैद्यकीय मदत आता स्थानकातच उपलब्ध होणार आहे. यासाठी पुणे रेल्वे स्थानकाच्या आवारात आपत्कालीन वैद्यकीय कक्ष उभारण्यात आला आहे. प्रवाशाची तब्येत बिघडल्यास या केंद्रात त्याच्यावर ताबडतोब प्राथमिक उपचार करून त्याला नजीकच्या सरकारी रुग्णालयात दाखल केले जाणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुणे रेल्वे स्थानकाच्या आवारात रेल्वे सुरक्षा दलाच्या पोलीस ठाण्याशेजारील जागेत आपत्कालीन वैद्यकीय कक्ष उभारण्यात आला आहे. हा कक्ष चालविण्याचे कंत्राट रुबी हॉल रुग्णालयाला देण्यात आले आहे. हे कंत्राट पाच वर्षांसाठी देण्यात आले आहे. रेल्वे गाडीत चढताना अथवा उतरताना अथवा इतर अन्य कारणांमुळे जखमी झालेल्या प्रवाशांवर या कक्षात मोफत प्रथमोपचार केले जाणार आहेत. याचबरोबर आजारी असलेल्या प्रवाशांवर केंद्र सरकारच्या आरोग्य योजनेच्या दरांनुसार उपचार केले जातील.

हेही वाचा – कापूस उत्पादनात ३० टक्क्यांपर्यंत घट, बिगरमोसमी पाऊस न झाल्याचा परिणाम

आजारी प्रवाशावर प्रथमोपचार करून गरज भासल्यास त्याला नजीकच्या सरकारी रुग्णालयात दाखल केले जाणार आहे. प्रवाशाने खासगी रुग्णालयात दाखल व्हायची इच्छा व्यक्त केल्यास त्याला तिथे नेले जाईल. यासाठी प्रवासी अथवा त्याच्या नातेवाइकाचे संमतीपत्र घेतले जाईल. प्रवाशाला रुग्णालयात नेण्यासाठी कक्षाकडून रुग्णवाहिका मोफत पुरविली जाईल. आपत्कालीन वैद्यकीय कक्षात औषध विक्री केंद्र सुरू करून कक्ष चालविणाऱ्या संस्थेला उत्पन्न मिळविता येणार आहे.

या कक्षाचे उद्घाटन रुबी हॉल क्लिनिकचे व्यवस्थापकीय विश्वस्त डॉ. परवेझ ग्रँट यांच्या हस्ते झाले. या वेळी पुणे विभागाच्या रेल्वे रुग्णालयाचे मुख्य वैद्यकीय अधीक्षक डॉ. एन. के. सजीव, वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक डॉ. मिलिंद हिरवे, विभागीय वाणिज्य व्यवस्थापक डॉ. रामदास भिसे आणि रुबी हॉल क्लिनिकचे मुख्य कार्यकारी अधिकारी बेहराम खोदाइजी, वैद्यकीय संचालक डॉ. प्रसाद मुगळीकर आदी उपस्थित होते.

हेही वाचा – मराठा आरक्षणावरून आंदोलनकर्ते आक्रमक; पिंपरीत सरकारचा घातला दशक्रिया विधी…आंदोलनकर्त्यांनी केले मुंडन…

आपत्कालीन वैद्यकीय कक्ष

  • आपत्कालीन कक्ष २४ तास सुरू राहणार.
  • कक्षात एक डॉक्टर, दोन परिचारिका.
  • ईसीजी, डिफ्रिबिलेटर, नेब्युलायझर आदी सुविधा.
  • जीवनावश्यक औषधे उपलब्ध.
  • प्रथमोपचार मोफत, तर इतर उपचार अल्प दरात.
  • नजीकच्या सरकारी रुग्णालयात नेण्यासाठी रुग्णवाहिका.
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 24 hours emergency medical room facility at pune station pune print news stj 05 ssb
Show comments