पुणे : घरफोडीचे १०० गुन्हे दाखल असलेल्या चोरट्याकडून ४२ तोळे सोन्याचे दागिने, चार किलो चांदीचे दागिने असा २४ लाख ६४ हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला. राजेश उर्फ चोर राजा राम पपुल (वय ३८, रा. सच्चाई माता मंदिर, कात्रज) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. राजेश पपुल याच्या विरोधात घरफोडीचे १०० गुन्हे दाखल आहेत. पपुल कात्रज भागात येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या युनिट दाेनमधील पोलीस कर्मचारी गजानन सोनुने यांना मिळाली. त्यानंतर सापळा लावून पपुलला पकडण्यात आले. त्याची चौकशी करण्यात येत होती. चौकशीत त्याने डेक्कन, बंडगार्डन, भारती विद्यापीठ, दत्तवाडी, सिंहगड रस्ता, वारजे, हडपसर, कोंढवा, वानवडी, सहकारनगर, सांगलीतील विश्रामबाग परिसरात घरफोडीचे गुन्हे केल्याचे तपासात निष्पन्न झाले.
त्याच्याकडून सोन्याचे दागिने, चांदीचे दागिने असा ऐवज जप्त करण्यात आला. पपुलने एके ठिकाणी केलेल्या घरफोडीत पिस्तुल, रिव्हाॅल्वर, काडतुसे चोरली होती. पोलिसांनी त्याच्याकडून पिस्तुल, रिव्हाॅल्वर, काडतुसे जप्त करण्यात आली. पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे, सहायक आयुक्त गजानन टोम्पे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील, सहायक निरीक्षक वैशाली भोसले, विशाल मोहिते, उपनिरीक्षक राजेंद्र पाटोळे, गजानन सोनुने, उज्वल मोकाशी, कादीर शेख, उत्तम तारु आदींनी ही कारवाई केली.