पुणे : वाघोलीतील एका नामांकित कंपनीच्या गोदामातून चोरीला गेलेल्या एक कोटी रुपयांच्या लॅपटाॅप चोरी प्रकरणाचा छडा पोलिसांनी लावला. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली. त्यांच्याकडून २४४ लॅपटॉप आणि दोन टेम्पो जप्त करण्यात आले.

सुरेश महादेव कुमार (वय ३५, रा. वाघोली, मूळ उत्तर प्रदेश), शिवाजी जगन्नाथ वसू (वय २७, रा. धानेगाव, छत्रपती संभाजीनगर), कुमुद रंजन झा (वय ३२, रा. वाघोली ) अशी अटक करण्यात आलेल्या चोरट्यांची नावे आहेत. वाघोलीतील उबाळेनगर परिसरात आर्कलाईन लॉजिस्टीक्स अँड वेअरहाऊस प्रा. लि. गोदामातील कामगाराने एक कोटी नऊ लाख रुपयांचे २८० लॅपटॉप चोरून नेल्याची घटना नुकतीच घडली. याप्रकरणी वाघोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. कंपनीतील कामगार सुरेश कुमारने साथीदारांच्या मदतीने लॅपटाॅप चोरल्याची माहिती तपासात मिळाली होती. याप्रकरणी पोलीस कर्मचारी अजित फरांदे तांत्रिक तपास सुरु केला. तपासात मिळालेल्या माहितीनंतर पोलिसांच्या पथकाने सापळा लावून तिघांना अटक केली. त्यांच्याकडून २४४ लॅपटॉप आणि दोन टेम्पो जप्त करण्यात आले.

हेही वाचा – जे निष्ठावंत आहेत आणि जे उमेदवार जिंकतील आशांना उमेदवारी दिली जाईल : प्रशांत जगताप

हेही वाचा – बनावट कागदपत्रांद्वारे ५६१ कोटी रुपयांची जीएसटी कर चुकवेगिरी- जीएसटी पुणे कार्यालयाकडून हैद्राबादमधील एकास अटक

गोदामातून चोरलेल्या लॅपटॉपची आरोपींनी नऊजणांना विक्री केल्याचे उघडकीस आले. आरोपींना तीन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालायने दिले. अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील, परिमंडळ चारचे पोलीस उपायुक्त हिम्मत जाधव, सहायक आयुक्त प्रांजली सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंडीत रेजीतवाड, सहायक निरीक्षक शिरीष भालेराव, योगेश खटके, अजित फरांदे, स्वप्नील जाधव, अमोल ढोणे, संदीप तिकोणे, विशाल गायकवाड, बाळासाहेब हराळ, सागर कडू यांनी ही कारवाई केली.