पुणे : गुरुवारी दिवसभरात जिल्ह्यातील २४६ जणांना करोना संसर्गाचे निदान झाले. राज्याच्या साथरोग सर्वेक्षण विभागाने याबाबत माहिती दिली. मात्र, बहुसंख्य करोना रुग्णांना सौम्य लक्षणे असून ते घरच्या घरी बरे होत असल्याने घाबरून जाण्याचे कारण नसल्याचे सार्वजनिक आरोग्य विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
गुरुवारी दिवसभरात आढळलेल्या २४६ नवीन रुग्णांपैकी १६० रुग्ण पुणे महापालिका क्षेत्रातील आहेत. ५९ रुग्ण पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रात, तर २७ रुग्ण जिल्ह्याच्या उर्वरित भागात आढळले आहेत. संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी विशेषत: जोखीम गटातील रुग्ण, सहव्याधीग्रस्त आणि ज्येष्ठ नागरिकांनी तसेच लसीकरण न झालेल्या नागरिकांनी मुखपट्टी वापरासह सर्व आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. गुरुवारी आढळलेल्या २४६ नव्या रुग्णांमुळे पुणे जिल्ह्यातील एकूण करोना रुग्णसंख्या १४ लाख ९८ हजार २९२ एवढी झाली आहे. जिल्ह्यातील १६२० रुग्णांवर उपचार सुरू आहेत.