पुणे : दिल्ली येथे उभारण्यात येणाऱ्या नव्या संसद भवनाचे व त्याला जोडणाऱ्या पथावरील नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्याचे अनावरण गुरुवारी (८ सप्टेंबर) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमात ज्येष्ठ गायक पं. सुहास व्यास यांच्या संकल्पनेअंतर्गत पुण्यातील २५ कलाकार ‘स्वातंत्र्यमंगलगान’ सादर करणार आहेत.
ज्येष्ठ गायक-गुरू आणि वाग्येयकार डाॅ. श्रीकृष्ण नारायण रातंजनकर यांनी काही स्वतंत्र बंदिशींची निर्मिती करून भारतीय स्वातंत्र्याला सांगीतिक मानवंदना दिली होती. यातीलच ‘मालकंस‘ रागातील एका बंदिशीचे पुण्यातील २५ कलाकार एकत्रितपणे सादरीकरण करणार आहेत. याची संकल्पना पं. सुहास व्यास यांची असून आशिष केसकर यांनी संगीत संयोजन केले आहे. केदार केळकर, अद्वैत केसकर, मंदार गाडगीळ, सौरभ नाईक, सौरभ काडगावकर, मेहेर परळीकर, साई ऐश्वर्य महाशब्दे, संजीव चिमलगी, आदिश्री पोटे, अदिती केसकर, आरती ठाकूर-कुंडलकर, रेवती कामत, अपर्णा केळकर, शर्वरी वैद्य, भाग्यश्री केसकर, पल्लवी पोटे या कलाकारांना अमेय बिचू (संवादिनी), भरत कामत (तबला), शुभम उगाळे (पखवाज), अमर ओक (बासरी), अतुल केसकर (सतार) साथसंगत करणार आहेत.