लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुणे : वाहन चोरीचे ५० हून जास्त गुन्हे दाखल असलेल्या चोरट्याला गुन्हे शाखेने अटक केली. चोरट्याकडून २५ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहे. पाच महिन्यांपूर्वी दुचाकी चोरीच्या गुन्ह्यात जामीन मिळवल्यानंतर चोरट्याने पुन्हा दुचाकी चोरीचे गुन्हे करण्यास सुरुवात केली. शंकर भरत देवकुळे (वय ३२, रा. मेमाणे वस्ती, ऊरुळी देवाची, सासवड रस्ता) असे अटक करण्यात आलेल्या चोरट्याचे नाव आहे.

पर्वती भागातून एक दुचाकी चोरीला गेली होती. गुन्हे शाखेच्या युनिट तीनचे पोलीस कर्मचारी ज्ञानेश्वर चित्ते तपास करत होते. पर्वती भागातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासण्यात आले. तेव्हा दुचाकी चोरीचा गुन्हा देवकुळेने केल्याची माहिती तपासात मिळाली. त्यानंतर पोलिसांनी तपास करुन त्याला इचलकरंजी परिसरातून ताब्यात घेतले. चोैकशीत तो पाच महिन्यांपूर्वी जामीन मिळवून कारागृहात बाहेर पडला होता.

पुणे शहर, परिसरातून दुचाकी चोरी केल्यानंतर तो वाहन क्रमांकाच्या पाट्या काढून टाकायचा. त्यानंतर दुचाकी त्याचा ओळखीचा गॅरेज मालक अनिकेत सुनील कुदळे (वय २७, रा. खडकी, ता. दौंड) याला नेऊन द्यायचा. कुदळे त्याच्या गॅरेजमधून जुन्या दुचाकींची विक्री करायचा. वित्तीय संस्थेचे हप्ते थकल्याने दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत, अशी बतावणी कुदळे करायचे. देवकुळेने तुळजापूरमधील मित्राकडे दुचाकी ठेवण्यास दिल्या होत्या. त्याच्याकडून दोन दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. त्याच्याकडून २५ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. चोरलेल्या १८ दुचाकी मालकांचा शोध लागला असून, उर्वरित दुचाकी मालकांचा शोध घेण्यात येत आहे.

देवकुळे हा सराइत वाहन चोरटा आहे. त्याच्याविरुद्ध पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहर परिसरात दुचाकी चोरीचे ५० हून अधिक गुन्हे दाखल आहेत. रस्त्यावर लावलेल्या दुचाकी बनावट चावीचा वापर करुन तो चोरायचा. देवकुळेने गॅरेजमालक कुदळे याला दुचाकी विक्रीस दिल्या होत्या. खासगी वित्तीय संस्थेत कामाला असल्याची बतावणी त्याने कुदळे याच्याकडे केली होती. दुचाकीचा चॅसी आणि इंजिन क्रमांकात खाडाखोड करुन ते दुचाकींची विकी केली जायची.

अतिरिक्त पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, उपायुक्त निखील पिंगळे, सहायक आयुक्त गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक रंगराव पवार, सहायक निरीक्षक ज्ञानेश्वर ढवळे, उपनिरीक्षक राजेंद्र पाटोळे, सहायक फौजदार मधुकर तुपसौंदर, पोलिस कर्मचारी शंकर वाकसे, संजीव कळंबे, सुजीत पवार, विनोद भंडलकर, ज्ञानेश्वर चित्ते, गणेश शिंदे, चेतन शिरोळकर, अक्षय गायकवाड, महेंद्र तुपसौंदर, उदय राक्षे, भाग्यश्री वाघमारे, शुभांगी म्हाळसेकर यांनी ही कामगिरी केली.

शेतकऱ्यांना दुचाकींची विक्री

दुचाकी चोरटा देवकुळे खासगी वित्तीय संस्थेत कर्मचारी असल्याची बतावणी करायचा. हप्त थकल्याने दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत, अशी बतावणी करुन त्याने गॅरेज मालक कुदळे याला स्वस्तात दुचाकींची विक्री केली. दौंड परिसरातील शेतकऱ्यांना कुदळेने स्वस्तात दुचाकींची विक्री केल्याचे तपासात उघडकीस आले.