स्वारगेट येथील उड्डाणपूल रस्ते विकास महामंडळाने केल्यास महापालिकेला तब्बल २५ कोटींचा भुर्दंड पडणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. स्थायी समितीच्या बैठकीत मंगळवारी आयुक्तांनीही महापालिकेने हा पूल बांधल्यास खर्च १५ टक्क्य़ांनी कमी होईल, ही बाब मान्य केली.
स्थायी समितीचे अध्यक्ष विशाल तांबे यांनी ही माहिती पत्रकार परिषदेत दिली. या पुलाचे काम रस्ते विकास महामंडळाने करावे असा निर्णय महापालिकेनेच यापूर्वी घेतला असून महामंडळाला पैसेही दिले आहेत. मात्र, आता हा पूल महापालिकेला चांगलाच महागात ठरणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. पुलाचे काम २५ टक्के कमी खर्चात करण्याची महापालिकेची तयारी असतानाही हे काम रस्ते महामंडळाला द्यावे असा आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काढला आहे. स्वारगेट चौकातील या पुलासाठी १५७ कोटी रुपये खर्च येईल असे रस्ते महामंडळाचे म्हणणे असून महापालिकेने हे काम केले तर या खर्चापेक्षा किमान २५ कोटींचा खर्च कमी होणार असल्याचे महापालिकेचे म्हणणे आहे. रस्ते महामंडळाची निविदा नऊ टक्के जादा दराने आली आहे. याशिवाय रस्ते महामंडळाला पाच टक्के शुल्क द्यावे लागणार आहे तसेच एका सल्लागारालाही शुल्क द्यावे लागणार आहे.
स्थायी समितीच्या बैठकीत मंगळवारी हा विषय आल्यानंतर वाढीव खर्चाबाबत चर्चा झाली. यावेळी महापालिकेने हे काम केल्यास २५ कोटी रुपये वाचू शकतात, असे आयुक्तांनी सांगितले. अखेर हा विषय आठ दिवस पुढे ढकलण्यात आला.
महापालिकेकडून मुद्दाम अडथळा
स्वारगेट उड्डाणपुलाचे काम करण्याची तयारी दर्शवून महापालिका ४० कोटी रुपये गमावणार का, असा प्रश्न स्थानिक आमदार माधुरी मिसाळ यांनी विचारला असून पुलाचे काम प्रत्यक्ष सुरू होण्याची वेळ आल्यामुळे आता महापालिकेकडून या कामात मुद्दाम अडथळा आणला जात आहे, अशीही टीका मिसाळ यांनी केली आहे. या पुलाच्या कामासाठी महापालिकेने रस्ते विकास महामंडळाला २००७-०८ मध्येच ४० कोटी रुपये दिले आहेत. पुलाचे काम सुरू व्हावे यासाठी मी गेली तीन वर्षे सातत्याने पाठपुरावा करत आहे. मात्र, आता महापालिकेच्याच मुख्य सभेने घेतलेला निर्णय तसेच उपमुख्यमंत्र्यांनी दिलेला आदेश धुडकावला जात आहे, अशीही टीका मिसाळ यांनी केली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा