पुणे : भारतीय जनता पक्षाचे माजी नगरसेवक, सभागृह नेते गणेश बिडकर यांच्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधून अज्ञाताने २५ लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. दोन दिवसांपूर्वी भाजपाचे सरचिटणीस मुरलीधर मोहोळ यांच्या नावे कोथरुड भागातील एका बांधकाम व्यावसायिकाकडे तीन कोटी रुपयांची खंडणी मागणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली होती.
याबाबत गणेश बिडकर (वय ५०, रा. सोमवार पेठ) यांनी सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. बिडकर गुरुवारी (३० मार्च) श्री रामनवमीनिमित्त काढण्यात आलेल्या शोभायात्रेत सहभागी झाले होते. त्या वेळी बिडकर यांच्या मोबाइल क्रमांकावर एकाने व्हाॅट्सॲप काॅल केला. बिडकर यांच्याकडे २५ लाखांची खंडणी मागितली.
हेही वाचा – पुणे : उच्चशिक्षित नवविवाहित दाम्पत्याची आत्महत्या; पत्नीपाठोपाठ पतीची आत्महत्या
हेही वाचा – गिरीश बापट यांचे सर्व पक्षीय नेत्याशी जिव्हाळ्याचे संबध होते: अजित पवार
बिडकर यांना शिवीगाळ करून दूरध्वनी करणाऱ्याने राजकीय कारकीर्द संपविण्याची धमकी दिली, तसेच बदनामी करण्याची धमकी देण्यात आली. बिडकर यांनी सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. आराेपी हिंदी-मराठी भाषेत बोलत होतो. बिडकर यांना धमकावणाऱ्या आरोपीचा पोलिसांकडून शोध घेण्यत येत आहे.