आंबेगाव बुद्रुक येथे एका हॉटेलमध्ये दारूच्या बिल देण्यावरून सराईत गुन्हेगार व त्याच्या साथीदारांनी मध्यरात्री धुमाकूळ घातला. या हॉटेलचा व्यवस्थापक आणि वेटरला मारहाण करत परिसरातील उभ्या असलेल्या २५ वाहनांची तोडफोड केली. वाहनांची तोडफोड करणाऱ्यांना पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवरच दगडफेक केली. त्यामुळे एका पोलीस अधिकाऱ्याला हवेत गोळीबार करावा लागला. शुक्रवारी मध्यरात्री पासून शनिवारी पहाटेपर्यंत तीन वाजेपर्यंत हा प्रकार सुरू होता. या प्रकरणी हवेली पोलिसांनी एकाला अटक केली आहे.
या प्रकरणी सराईत गुन्हेगार अमित चोरगे (रा. आंबेगाव पठार), करण ऊर्फ बॉबी रोहिदास पाटोळे (रा. तळजाई वसाहत), हर्षद धनावड, विशाल ढमाले आणि त्यांच्या साथीदारांविरुद्ध यांच्यावर गुन्हा दाखल आहे. या प्रकरणी हवेली पोलिसांनी दोन स्वतंत्र गुन्हे दाखल केले आहेत. यामध्ये चंद्रभागा हॉटेलचे मालक प्रकाश हेगडे (वय ४९) आणि हवेली पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक सुनील क्षीरसागर यांनी तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आंबेगाव बुद्रुक परिसरात दत्तनगर येथे प्रकाश हेगडे यांच्या चंद्रभागा हॉटेल आहे. शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास चोगरे व त्याचे साथीदार हॉटेलमध्ये दारू पिण्यासाठी आले. मध्यरात्री एकच्या सुमारास दारू पिल्यानंतर बिल देण्यावरून त्यांची हॉटेल व्यवस्थापकाशी वादावादी झाली. त्या वेळी त्यापैकी काही जणांनी आणखी आपल्या साथीदारांना बोलवून घेतले. त्यांनी हॉटेलचे वेटर व व्यवस्थापकाला मारहाण करण्यास सुरुवात केली. त्या वेळी घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर ग्रामीण व शहर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. तोपर्यंत या टोळक्याचा धुमाकूळ सुरू होता. त्यांनी येथील २३ मोटारी व दोन रिक्षांची तोडफोड केली. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक सुनील क्षीरसागर, हवालदार कांबळे, पाठक हे त्या ठिकाणी पोहोचले. पोलीस आल्याचे पाहून टोळक्याने त्याच्या दिशेने दगडफेक करण्यास सुरुवात केली. त्या वेळी क्षीरसागर यांनी हवेत दोन गोळीबार केले. त्यानंतर अंधाराचा फायदा घेऊन पळून जात असताना एकाला पकडण्यात पोलिसांना यश आले. या घटनेत एका पोलीस कर्मचाऱ्यासह पाच जण किरकोळ जखमी झाले आहेत. वाहनांची तोडफोड झाल्यानंतर घटनास्थळाची पाहाणी करण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांना यामध्ये आमचा दोष काय म्हणून विचारणा करत होते. चोरगे हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल आहेत.