फिल्म टेलीव्हीजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियामध्ये (एफटीआयआय) एका २५ वर्षीय विद्यार्थिनीने गुरुवारी दुपारी आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. कामाक्षी बोहरा, असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे. ती मूळची उत्तराखंड येथील आहे. आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही.

कामाक्षी ही २०१९ पासून येथील वसतीगृहात राहण्यास आहे. ती ‘पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा इन अ‍ॅक्टींग’मध्ये शिक्षण घेत होती. गुरुवारी कामाक्षी वर्गात न आल्याने शिक्षकांनी काही विद्यार्थिनींना ती राहत असलेल्या खोलीत जाऊन पाहण्यास सांगितले. त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. माहिती मिळताच डेक्कन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुरलीधर करपे यांच्यासह अधिकारी, कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.

नैराश्यातून तिने आत्महत्येचे पाऊल उचलले असावे, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. दरम्यान, मागील महीन्यात म्हणजेच ५ ऑगस्ट रोजी येथील वसतीगृहात एका तरुणाने नैराश्यातून आत्महत्या केल्याची घटना घडली होती. यानंतर महिनाभरातच दुसरी घटना घडल्याने खळबळ उडाली आहे.

Story img Loader