‘भारत माता की जय’च्या जयघोषात देशाच्या सीमेवर लढणाऱ्या सैनिकांसाठी पुणेकरांतर्फे २५ हजार राख्या नुकत्याच रवाना करण्यात आल्या.
सैनिकांना आपला भाऊ मानणाऱ्या पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील बहिणींनी राख्या सीमेवर पाठविण्यासाठी पुढाकार घेतला. सैनिक मित्र परिवार आणि त्वष्टा कासार समाज गणेशोत्सव मंडळातर्फे कसबा पेठेतील महाकालिका मंदिर येथे ज्येष्ठ गायिका अनुराधा मराठे आणि पारंपरिक वेषात आलेल्या चिमुकल्यांच्या हस्ते राख्यांचे पूजन करण्यात आले. मंडळाचे अध्यक्ष सुरेश पोटफोडे, अॅड. बिपीन पाटोळे, सैनिक मित्र परिवाराचे अशोक मेहेंदळे, आनंद सराफ, नीता करडे, वीरमाता सुवर्णा गोडबोले, वीरपत्नी दीपाली मोरे, सुनीता गायकवाड, स्व-रूपवर्धिनीच्या पुष्पा नढे या वेळी उपस्थित होत्या. ‘सैनिक हो तुमच्यासाठी’ या अनुराधा मराठे यांनी गायलेल्या आणि ‘ऐ मेरे वतन के लोगो’ या मनीषा निजामपूरकर यांनी गायलेल्या गीताने वातावरण भारावले. कल्याणी सराफ, गिरिजा पोटफोडे, रूपाली मावळे, राजू पाटसकर यांनी संयोजन केल होते. योगिनी समेळ-हजारे यांनी सूत्रसंचालन केले.