पिंपरी-चिंचवड शहरातील प्रमुख दहा विसर्जन घाटांवर रविवारपासून (४ सप्टेंबर) वैद्यकीय पथकांसह सुसज्ज रुग्णवाहिका तैनात ठेवण्यात येणार आहेत. तर, विसर्जनाच्या दिवशी जवळपास २६ विसर्जन घाटांवर अग्निशमन दलाची पथके कार्यरत असणार आहेत.शहरातील गणेश विसर्जनासाठी पिंपरी पालिकेची यंत्रणा सज्ज आहे. निगडी प्राधिकरणातील गणेश तलाव, वाल्हेकरवाडीतील जाधव घाट, काळेवाडी घाट, पिंपळे गुरव घाट, वाकड गावठाण घाट, मोशी घाट, चिखली घाट, थेरगाव पूल घाट, पिंपरीतील सुभाषनगर घाट आणि सांगवीतील वेताळबाबा मंदिर घाट याठिकाणी वैद्यकीय साहित्य, औषधे आणि रुग्णवाहिकेसह वैद्यकीय पथक तैनात ठेवले जाणार आहे.
४ ते ९ सप्टेंबर २०२२ या कालावधीत विसर्जन घाटांवर ही वैद्यकीय पथके कार्यरत असतील, अशी माहिती सहायक आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ.लक्ष्मण गोफणे यांनी दिली. तसेच, अग्निशमन विभागाच्या वतीने शहरातील २६ विसर्जन घाटांवर अग्निशमन दलाचे सुसज्ज पथक तैनात करण्यात आले आहे. क्षेत्रीय कार्यालयांमार्फत स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. विसर्जन घाटांवर कृत्रिम हौद उभारण्यात आले आहेत.
हेही वाचा : पुणे : गणेश विसर्जनासाठी पुणे महापालिकेची तयारी पूर्ण
या वर्षी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करायचा आहे. विसर्जनासाठी पालिकेने केलेल्या विविध व्यवस्थांचा शहरवासीयांनी तथा गणेशभक्तांनी लाभ घ्यावा. शहरातील पर्यावरणप्रेमींच्या सहकार्याने मूर्तिदान मोहीम राबवण्यात येत आहे, त्यात स्वेच्छेने सहभागी व्हावे. प्लास्टिकचा वापर टाळावा आणि नदी व परिसर स्वच्छ ठेवावा. – शेखर सिंह, आयुक्त, पिंपरी पालिका