पुणे : कथा या वाङ्मय प्रकाराला नावारूपाला आणण्याबरोबरच बहराचा कालावधी असलेल्या काळात नवकथाकारांचे हक्काचे व्यासपीठ असलेल्या ‘सत्यकथा’ मासिकातील २७ नक्षत्रं आता ‘सत्त्वकथा’ रूपात वाचण्याची मौज वाचकांना उपलब्ध झाली आहे. १९६० ते १९७० या दशकातील काहीशा अलक्षित पण अस्सल बीज असलेल्या २७ कथांचा ‘सत्त्वकथा’ हा गुच्छ प्रकाशित करून ‘देशमुख आणि कंपनी’च्या मुक्ता गोडबोले या नव्या पिढीच्या प्रकाशकाने प्रकाशन क्षेत्रातील ऋषितुल्य श्री. पु. भागवत यांना अभिवादन केले आहे.

देशमुख आणि कंपनी प्रकाशन संस्थेचे लेखक मधुकर धर्मापुरीकर यांनी ‘सत्यकथे’चे दुर्मीळ अंक संकलित करून स्नेहा अवसरीकर यांच्या सहकार्याने १९६० ते १९७० या दशकातील २७ कथांची निवड केली आहे. या दोघांनी पुस्तकाचे संपादन केले आहे. यानिमित्ताने ‘सत्यकथे’ला जोडले जाण्याची आणि संपादन क्षेत्रातील ज्येष्ठ श्री. पु. भागवत यांच्या कार्याचे महत्त्व अधोरेखित करण्याची संधी मिळाली याचा आनंद आहे, अशी भावना देशमुख आणि कंपनीच्या संचालक मुक्ता गोडबोले यांनी व्यक्त केली.

‘मराठी साहित्यात कथा या वाङ्मय प्रकाराला मोठी परंपरा लाभली आहे. या परंपरेत ‘सत्यकथा’ मासिकात प्रकाशित झालेल्या कथांना आजही मोठे महत्त्व आहे. नोव्हेंबर १९३३ मध्ये सत्यकथा हे वाङ्मयीन मासिक प्रकाशित होऊ लागले. त्या काळात सत्य कथानकांवर आधारित कथा देण्याचाच संपादकांचा हेतू होता. मात्र, पुढे नवकथा आणि भिन्न संवेदना नोंदविणाऱ्या प्रयोगशील कथा ‘सत्यकथे’ने कायम प्रकाशित केल्या. १९३३ ते १९८२ अशा पाच दशकांच्या कालखंडात ‘सत्यकथे’त तीन पिढ्यातील लेखकांच्या कथा प्रकाशित होत असत,’ असे गोडबोले यांनी सांगितले.

‘सत्यकथे’मध्ये कथा प्रकाशित झाली की त्या लेखकाला कथालेखक म्हणून मान्यता आणि प्रतिष्ठा मिळत असे. या काळात ‘सत्यकथे’चे संपादक श्री. पु. भागवत आणि राम पटवर्धन यांच्या साक्षेपी संपादनामुळे नवकथेचा, ‘सत्यकथे’च्या कलाविषयक मूल्यदृष्टीचा प्रभाव खोलवर पडलेला आहे,’ याकडे त्यांनी लक्ष वेधले.

‘सत्यकथे’तील १९६०-७० या दशकातल्या निवडक लघुकथांचा ‘सत्त्वकथा’ हा संग्रह आहे. लघुकथा आणि अनोळखी कथालेखक हे मुद्दे; तसेच एकच परिणाम साधणारी लघुकथा आणि तिचा प्रभाव; असे प्रयोजन ठेवून हे संपादनाचे काम केलेले आहे. पन्नास वर्षांपेक्षा जुन्या असलेल्या या कथा आजही मोलाच्या वाटतात. -मुक्ता गोडबोले, संचालक, देशमुख आणि कंपनी

Story img Loader