पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतून वाहणाऱ्या मुळा नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाचे काम महापालिका हाती घेणार आहे. त्यासाठी २७६ कोटी ५४ लाख रुपये खर्च येणार असून, हे काम बी. जी. शिर्के कन्स्ट्रक्शन टेक्नोलॉजी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला देण्यात आले आहे. कामाचा कालावधी ३६ महिन्यांचा असणार आहे. याबाबतच्या प्रस्तावाला आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी मंगळवारी (दि. २५) मान्यता दिली.
पिंपरी-चिंचवड आणि पुणे महापालिका हद्दीतून मुळा नदी वाहते. दोन्ही महापालिका हद्दीत या नदीची लांबी ४४.४० किलोमीटर आहे. पिंपरी – चिंचवड महापालिका हद्दीलगत मुळा नदीच्या काठाची लांबी सुमारे १४.२० किलोमीटर इतकी आहे. या पूर्ण नदीचा अधिकांश भाग हा पुणे महापालिका हद्दीत येत असल्याने नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाचे काम पुणे महापालिकेसोबत संयुक्तरीत्या करण्यात येणार आहे.
हेही वाचा >>> जेजुरीच्या खंडोबा गडावर तरुणाला भाविकांच्या टोळक्याकडून बेदम मारहाण
पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील नदीच्या पुनरुज्जीवनासाठी महापालिकेने निविदा प्रक्रिया राबविली होती. निविदा रक्कम ३२० कोटी ८५ लाख रुपये होती. निविदेला एकवेळा मुदतवाढ दिली. या निविदा प्रक्रियेत चार ठेकेदारांनी सहभाग घेतला. त्यांपैकी एक अपात्र, तर तीन निविदा पात्र झाल्या. बी. जी. शिर्के कन्स्ट्रक्शन टेक्नोलॉजी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची निविदा निविदादरापेक्षा १४.२५ टक्क्यांनी कमी दराने आली. तुलनात्मकदृष्ट्या वाजवी दराची आणि ठेकेदार मुदतीमध्ये काम करण्यास सक्षम असल्याने आयुक्त शेखर सिंह यांनी २४ एप्रिल रोजी ही निविदा स्वीकारण्यास मान्यता दिली. त्यानुसार बी. जी. शिर्के कंपनीकडून २७६ कोटी ५४ लाख रुपयांत काम करून घेण्यास आणि त्यांच्यासोबत करारनामा करण्यास स्थायी समितीने मान्यता दिली.