लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे : नगर रस्त्यावरील वाघोली भागात नामांकित कंपनीच्या गोदामातील कामगारांनी एक कोटी नऊ लाख रुपयांचे २८० लॅपटॉप चोरून नेल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांकडून आरोपींचा शोध घेण्यात येत आहे.
सुरेश कुमार (रा. उबाळेनगर, वाघोली, नगर रस्ता) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या कामगाराचे नाव आहे. याबाबत बाळकृष्ण सखाराम राऊत (वय ३८, रा. केसनंद, हवेली) यांनी फिर्याद दिली आहे. वाघोलीतील उबाळेनगर परिसरात आर्कलाईन लॉजिस्टीक्स अॅण्ड वेअरहाऊस प्रा. लि. कंपनीत ही घटना घडली.
आणखी वाचा-पोलीस कारवाईची भीती दाखवून तरुणाची २३ लाखांची फसवणूक
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित कंपनीच्या गोदामात विविध कंपन्यांची इलेक्ट्रॉनिक्स उत्पादने ठेवली जातात. गोदामातून शहरातील विविध दुकानात इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे विक्रीस पाठविले जातात. राऊत कंपनीत व्यवस्थापक आहेत. गोदामात आरोपी सुरेश कुमार गेल्या दोन महिन्यांपासून कामावर होता. सोमवारी सकाळी गोदामातून २८० लॅपटॉप चोरून नेल्याचा प्रकार उघडकीस आला. या घटनेची माहिती मिळताच वाघोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंडीत रेजीतवाड यांनी घटनास्थळी भेट दिली. आरोपी सुरेशकुमार याचा पोलिसांकडून शोध घेण्यात येत असल्याचे पोलीस निरीक्षक रेजीतवाड यांनी सांगितले.
आणखी वाचा-शालेय पोषण आहार योजनेत महत्त्वाचा बदल… आता काय होणार?
दोन वर्षांपूर्वी २०० महागडे मोबाइल संच चोरी
दोन वर्षांपुर्वी वाघोली परिसरातीलच एका नामांकित कंपनीच्या गोदामातून चोरट्यांनी २०० महागडे मोबाइल संच चोरुन नेले होते. पोलिसांनी याप्रकरणाचा तपास करुन परप्रांतीय चोरट्यांना अटक केली होती.