‘सर्वांसाठी घरे’ या योजनेअंतर्गत केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत शहरात पाच गृहप्रकल्पांची कामे सध्या वेगाने सुरू आहेत. सर्व गृहप्रकल्पांची कामे ८० टक्के पूर्ण झाली असून मार्च २०२३ पर्यंत सर्व सदनिकांचा ताबा देण्याचे नियोजन महापालिकेकडून करण्यात आले आहे. दरम्यान, पाच गृहप्रकल्पांमध्ये मिळून २८५ सदनिका रिक्त आहेत.
हेही वाचा : विश्लेषण : ‘आदिपुरुष’वर खरंच बंदी घातली जाऊ शकते का? सेन्सॉर बोर्डचे नियम जाणून घ्या
प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत वडगांव खुर्द येथील सदनिकांची पाहणी अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे यांनी गुरुवारी केली. नगर अभियंता प्रशांत वाघमारे, अधीकक्ष अभियंता युवराज देशमुख, विद्युत विभागाचे प्रमुख श्रीनिवास कंदुल, कार्यकारी अभियंता बिपिन शिंदे या वेळी उपस्थित होते.
हेही वाचा : चीनला ‘जशास तसे’ उत्तर का नाही ?
हडपसर, खराडी, वडगांव खुर्द या ठिकाणी महापालिकेच्या वतीने प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत पाच गृहप्रकल्पांची कामे सुरू आहेत. या प्रकल्पांसाठीची जागा महापालिकेने विनामूल्य उपलब्ध करून दिली आहे. पाच गृहप्रकल्पाअंतर्गत २ हजार ९१८ सदनिकांचे प्रथम ऑनलाइन सोडत पद्धतीने वाटप करण्यात आले होते. मात्र करोना संसर्ग संकट काळात नागरिकांच्या वैयक्तिक अडचणी, उत्पन्न स्रोताअभावी कर्ज प्रकरणे मंजूर न होणे, जागा पसंत न पडणे या कारणांमुळे अनेक सदनिकांची नोंदणी पात्र लाभार्थींकडून रद्द करण्यात आली.
हेही वाचा : पुणे महापालिकेतील पदांच्या परीक्षेला कागदपत्रांअभावी उमेदवार मुकले
पहिल्या ऑनलाइन सोडतीनंतर आणि प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य यानुसार शिल्लक राहिलेल्या आणि रद्द होऊन शिल्लक राहिलेल्या सदनिकांसाठी नागरिकांकडून अर्ज मागविण्यात आले होते. रिक्त सदनिकांची ऑनलाइन सोडत काढण्यात आली. सध्या पाच प्रकल्पांमध्ये २८५ सदनिका रिक्त आहेत. या रिक्त सदनिकांसाठी प्रतीक्षा यादीमधील नागरिकांच्या कागदपत्रांची पडताळणी सुरू आहे.
सर्व गृहप्रकल्प शहरातील प्रमुख ठिकाणी असून सदनिकांचे क्षेत्रफळ सुमारे तीनशे चौरस फूट ते ३३० चौरस फूट एवढे आहे. विविध प्रकारच्या उच्च दर्जाच्या सुविधा सदनिकाधारकांना देण्यात येणार आहेत. या सर्व सदनिकांची कामे ८० टक्के पूर्ण झाली असून मार्च २०२३ पर्यंत सदनिकांचा ताबा देण्याचे नियोजन आहे.