स्वाइन फ्लूमुळे सप्टेंबर महिन्यात पुण्यात २९ जणांचा मृत्यू झाला असून ऑक्टोबरमध्येही पहिल्या ६ दिवसांत स्वाइन फ्लूमुळे तिघांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. सध्या शहरात उपचार घेणाऱ्या स्वाइन फ्लू रुग्णांच्या संख्येत अजून म्हणावी तशी घट झालेली नाही.
सध्या सुरू असलेली स्वाइन फ्लूची साथ पावसाळी (पोस्ट मान्सून पीक) आहे. यापूर्वीच्या हिवाळी साथीत फेब्रुवारीमध्ये स्वाइन फ्लूच्या रुग्णसंख्येबरोबरच मृत्यूंची संख्याही एकदम वाढली होती. फेब्रुवारीत शहरात स्वाइन फ्लूच्या ३७१ रुग्णांची नोंद झाली होती, तर २१ रुग्णांचा स्वाइन फ्लूमुळे मृत्यू झाला होता. त्यानंतर मार्चमध्येही शहरात स्वाइन फ्लूचे जवळपास तितकेच- ३६८ रुग्ण सापडले. या महिन्यात स्वाइन फ्लूच्या बळींचा आकडा मात्र वाढून ४८ झाला. त्यानंतर स्वाइन फ्लूमुळे झालेल्या मृत्यूंचा मोठा आकडा सप्टेंबरमध्ये दिसला असून या महिन्यात पुण्यात २९ मृत्यूंची नोंद झाली आहे. सप्टेंबरमध्ये सापडलेल्या स्वाइन फ्लू रुग्णांची संख्या १४६ होती.
ऑक्टोबर महिन्याचा एक आठवडा सरला असला, तरी ऑक्टोबरमध्ये जाणवणारा उन्हाळा अद्याप सुरू झालेला नाही. शहरात सध्या उपचार घेत असलेल्या स्वाइन फ्लू रुग्णांच्या संख्येतही अजून लक्षणीय घट दिसून आलेली नाही. सध्या पुण्यात स्वाइन फ्लूचे ३० रुग्ण विविध रुग्णालयांत दाखल असून त्यातील १३ जणांना कृत्रिम श्वासोच्छवासावर ठेवण्यात आले आहे. आणखी ३ संशयित रुग्णही रुग्णालयात दाखल आहेत. ऑक्टोबरमध्ये पहिल्या ६ दिवसांत पुण्यात स्वाइन फ्लूच्या ३ बळींची नोंद झाली आहे.
ऑक्टोबरमध्ये डेंग्यूचे ५२ संशयित रुग्ण
ऑक्टोबरमध्ये आतापर्यंत पुण्यात ५२ संशयित डेंग्यूरुग्ण सापडले आहेत, यातील १५ रुग्णांची नोंद मंगळवारीच झाली आहे. या वर्षी जानेवारीपासून आढळलेल्या संशयित डेंग्यूरुग्णांपैकी ९३ टक्के रुग्ण केवळ गेल्या तीन महिन्यांत आढळले आहेत. जुलैपासून आतापर्यंत पुण्यात ५७३ संशयित डेंग्यूरुग्ण आढळले आहेत. पालिकेच्या आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार शहरात डेंग्यूमुळे एका रुग्णाचा मृत्यू झाला असून हा मृत्यू ऑगस्टमध्ये झाला होता.