सीएनजीवर चालणाऱ्या रिक्षा व इतर वाहनांची संख्या लक्षात घेता त्या प्रमाणात सीएनजीची उपलब्धता नसल्याने निर्माण झालेल्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी राज्य शासनाकडून ऑईल कंपन्यांबरोबर बैठक घेण्यात येणार आहे. दरम्यान, शहरातील सीएनजीचा दुसरा ऑनलाईन पंप पौड रस्त्यावर सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे सीएनजी मिळण्याबाबत परिस्थितीत काहीशी सुधारणा होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
प्रदूषणाच्या मुद्दय़ावर रिक्षांना सीएनजीची सक्ती करण्यात आली आहे. दुसरीकडे पेट्रोलचे दर सातत्याने वाढत आहेत. त्यातून शहरात सध्या बहुतांश रिक्षा सीएनजीवर परावर्तित करण्यात आल्या आहेत. मात्र, वाहनांच्या प्रमाणात शहरात सीएनजी पंपांची संख्या नसल्याने पुरवठय़ाबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. पुरवठा कमी प्रमाणात होत असल्याने सीएनजीच्या पंपावर रिक्षा चालकांच्या सातत्याने रांगा दिसून येतात. सीएनजी भरण्यासाठी अनेक वेळ रांगेतच घालवावा लागत असल्याने व्यवसायावर परिणाम झाल्याची तक्रार रिक्षा चालकांकडून करण्यात येत आहे.
रिक्षा चालक- मालक संघटनांच्या राज्य कृती समितीबरोबर मुख्यमंत्र्यांनी नुकतीच बैठक घेतली. त्यातही पुण्यातील सीएनजीच्या प्रश्नावर चर्चा करण्यात आली. या प्रश्नावर येत्या आठवडय़ामध्ये राज्य शासन ऑईल कंपन्यांच्या क्षेत्रीय व्यवस्थापकांशी बैठक घेईल, असे या बैठकीत राज्य शासनाच्या वतीने सांगण्यात आल्याचे कृती समितीचे सरचिटणीस नितीन पवार यांनी सांगितले.
दरम्यान, सध्या शहरामध्ये तानाजी वाडी येथे सीएनजीचा ऑनलाईन पंप आहे. दुसरा ऑनलाईन पंप पौड रस्त्यावर पोलीस ठाण्याच्या समोरच्या बाजुला नुकताच सुरू करण्यात आला. हा पंपही २४ तास सुरू राहणार आहे. या पंपामुळे त्या भागात सीएनजी मिळण्याबाबतचा प्रश्न काही प्रमाणात मार्गी लागला आहे. येत्या काही दिवसामध्ये नगर रस्ता व वारजे या दोन ठिकाणीही ऑनलाईन सीएनजी पंप सुरू करण्याचे नियोजन आहे.
विद्यार्थी वाहतुकीचे प्रात्यक्षिक
रिक्षातून किती विद्यार्थ्यांची वाहतूक करावी, हा अनेक दिवसांपासून प्रलंबित राहिलेला प्रश्न आहे. याबाबत रिक्षा संघटना व प्रशासनामध्ये मतभेद आहेत. रिक्षातून दहा विद्यार्थ्यांची योग्य प्रकारे वाहतूक होऊ शकते, असा रिक्षा संघटनांचा दावा आहे. त्यानुसार दहा विद्यार्थ्यांची सुलभ व सुरक्षितपणे वाहतूक कशी होते, याचे प्रात्यक्षिक येत्या आठ ऑगस्टला परिवहन सचिव पाहणार आहेत.

Story img Loader