लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील (आयटीआय) प्रवेश प्रक्रियेत निवड झालेल्या उमेदवारांची दुसर्‍या फेरीची निवड यादी जाहीर झाली आहे. या फेरीत ५१ हजार ९९ विद्यार्थ्यांना शासकीय आणि खासगी आयटीआयमध्ये प्रवेश मिळणार असून २८ जुलै ते २ ऑगस्टदरम्यान दुसर्‍या यादीचे प्रवेश होणार आहेत.

व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयातर्फे आयटीआय प्रवेशासाठी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. दुसऱ्या फेरीसाठी शासकीय आयटीआयमध्ये ६१ हजार ८९३ जागा, तर खासगी आयटीआयमध्ये ३४ हजार ८१३ जागा अशा एकूण ९६ हजार ७०६ जागा उपलब्ध होत्या. त्यापैकी सरकारी संस्थांमध्ये ४४ हजार १०९ आणि खासगी आयटीआयमध्ये ६ हजार ९९० अशा एकूण ५१ हजार ९९ विद्यार्थ्यांना प्रवेश जाहीर झाला आहे. पहिल्या फेरीत एकूण १ लाख ५० हजार ३४४ जागा उपलब्ध होत्या. त्यापैकी ८२ हजार ४३७ विद्यार्थ्यांना प्रवेश जाहीर झाला होता. यात शासकीय आयटीआयमध्ये ६७ हजार ४४४, खासगी आयटीआयमध्ये १४ हजार ९८९ विद्यार्थ्यांचा समावेश होता. त्यापैकी शासकीय संस्थांमध्ये ३० हजार ९५४ उमेदवारांनी आणि खासगी संस्थांमध्ये ९ हजार २२७ अशा एकूण ४० हजार १८१ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केला.

आणखी वाचा-पुणे : तीनदा समन्स बजावूनही पूजा खेडकर जबाब नोंदवण्यास गैरहजर

निवड यादी जाहीर झाल्यानंतर आता विद्यार्थ्यांना निवडपत्र त्यांच्या लॉग-इनमध्ये जाऊन डाउनलोड करता येईल. विद्यार्थ्यांना त्यांच्या पसंतीक्रमातील पहिल्या पसंतीक्रमाच्या संस्थेत प्रवेश मिळाला असल्यास त्यांना प्रवेश निश्चित करणे अनिवार्य आहे. प्रवेश न घेतल्यास संबंधित विद्यार्थ्यांना पुढील फेरीत सहभागी होता येणार नाही, असे संचालनालयाने स्पष्ट केले आहे.