कोणताही अनुचित प्रकार न होता विधायक पद्धतीने उत्सव साजरा व्हावा यासाठी गणेशोत्सवामध्ये ९ सप्टेंबर, १८ आणि १९ सप्टेंबर असे तीन दिवस जिल्हय़ातील दारूची दुकाने बंद ठेवावीत, असे आदेश उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार यांनी शनिवारी जिल्हाधिकाऱ्यांना दिले. मात्र, दुकाने बंद आहेत हे ध्यानात घेऊन आधीच व्यवस्था करून ठेवू नका, असेही त्यांनी कार्यकर्त्यांना बजावले.
पुणे पोलीस विघ्नहर्ता न्यासातर्फे आयोजित कार्यक्रमात अजित पवार यांच्या हस्ते गणेशोत्सव स्पर्धेतील विजेत्या मंडळांना पारितोषिके प्रदान करण्यात आली. पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे, जिल्हाधिकारी विकास देशमुख, ज्येष्ठ व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर, आमदार गिरीश बापट, मोहन जोशी, जयदेव गायकवाड, बापू पठारे, पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ, सहआयुक्त संजीवकुमार सिंघल, न्यासाचे विश्वस्त डॉ. मििलद भोई या प्रसंगी व्यासपीठावर होते.
गणेशोत्सवाला विधायक वळण देणारे ज्योतिर्भास्कर जयंतराव साळगावकर यांचे निधन झाले. त्याच दिवशी डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची दुर्दैवी हत्या झाली. त्यांचे मारेकरी सापडत नाहीत हे आणखी दुर्दैव आहे. धार्मिक गणेशोत्सवाला सामाजिक अधिष्ठान लाभावे यासाठी काम करणारे साळगावकर आणि अनिष्ट रूढी-परंपरा याच्याविरोधात ध्येयाने प्रेरित होऊन लढणाऱ्या दाभोलकर या दोघांनीही आपल्या परीने योगदान दिले. त्यांच्या भूमिका परस्परविरोधी वाटतीलही. पण, उत्सवाला विधायक वळण दिले पाहिजे यावर दोघांचेही एकमत होते, अशा शब्दांत अजित पवार यांनी आदरांजली अर्पण केली.
राज्य सरकारने १४ ते १८ सप्टेंबर या कालावधीत रात्री बारापर्यंत ध्वनिक्षेपकाचा वापर करण्याची परवानगी दिली आहे. मात्र, ध्वनीच्या विहित मर्यादेचे पालन करणे गरजेचे आहे, असे सांगून अजित पवार म्हणाले, गेल्या वर्षी विविध मंडळांनी दीड हजार सीसीटीव्ही बसविले आहेत. उत्सव मंडप आणि गर्दीच्या ठिकाणी बसविलेल्या कॅमेऱ्यांमुळे वाईट प्रवृत्तींना आळा बसू शकतो. राज्य सरकारनेही सीसीटीव्ही बसविण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, टेंडर प्रक्रियेमुळे त्याला वेळ लागतो आहे. अशा परिस्थितीत सारे काही सरकार करेल, अशी समजूत करून न घेता सक्षम मंडळांनीच पुढाकार घेऊन यामध्ये सरकारला सहकार्य करावे. शहराची आणि महिलांची सुरक्षितता महत्त्वाची आहे. महिलांची टिंगलटवाळी खपवून घेतली जाणार नाही. महिलांची सुरक्षा महत्त्वाची हे ध्यानात घेत कार्यकर्त्यांनी काम करावे.
गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांवरील जुने खटले काढून घेत त्यांची पाटी कोरी करावी, अशी मागणी गिरीश बापट यांनी केली. गुलाबराव पोळ म्हणाले, उत्सवामध्ये अनुचित प्रकार घडू नयेत यासाठी कार्यकर्त्यांनी जागरूक असावे. पोलिसांना हस्तक्षेप करण्याची गरज भासणार नाही असा गणेशोत्सव साजरा करूयात. पूर्वी ७५ संख्या असलेली ढोल-ताशा मंडळे आता २५० झाली आहेत. त्यांनी केवळ लक्ष्मी रस्त्याचा आग्रह न धरता अन्य विसर्जन मार्गावरही आपल्या कलेचा आविष्कार सादर करावा.
डॉ. गाडे म्हणाले, राष्ट्रीय सेवा योजनेच्या पाच हजार विद्यार्थ्यांनी गेल्या वर्षी प्रशिक्षण घेऊन पोलीस मित्र म्हणून काम केले. यंदा ही संख्या दहा हजार असेल. मकरंद रानडे यांनी प्रास्ताविक केले. राहुल सोलापूरकर यांनी सूत्रसंचालन केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा