रंगभूमीच्या क्षेत्रात मानाचे पान असलेल्या ‘भारत रंग महोत्सव’ या प्रतिष्ठित नाटय़महोत्सवात तीन मराठी नाटकांचे प्रयोग होणार आहेत. ‘आषाढातील एक दिवस’, ‘डू अँड मी’ आणि ‘बॉम्बे १७’ या तीन नाटकांना हा बहुमान लाभला आहे.
राष्ट्रीय नाटय़ विद्यालयातर्फे (नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा- एनएसडी) हा नाटय़महोत्सव आयोजित केला जातो. या महोत्सवाचे यंदा १७ वे वर्ष असून १ ते १८ फेब्रुवारी या कालावधीत दिल्ली येथे हा महोत्सव रंगणार आहे. गेली काही वर्षे मराठी नाटकांची सातत्याने या महोत्सवासाठी निवड होत असून, मराठी रंगभूमीवरील दर्जेदार नाटके आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रेक्षकांपर्यंत पोहोचत आहेत. यंदाच्या महोत्सवात निवड झालेल्या नाटकांमध्ये दोन नाटके पुण्याची, तर एक नाटक मुंबईमधील आहे.
श्री सिद्धिविनायक आणि नाटकघर या संस्थांची संयुक्त निर्मिती असलेल्या ‘आषाढातील एक दिवस’ या नाटकाचे दिग्दर्शन अतुल पेठे यांनी केले आहे. मोहन राकेश यांच्या मूळ ‘आषाढ हा एक दिन’ या हिंदूी नाटकाचा अभिनेत्री ज्योती सुभाष यांनी अनुवाद केला आहे. महाराष्ट्र कल्चरल सेंटरच्या ‘डू अँड मी’ या ग्रिप्स शैलीच्या नाटकाचे लेखन-दिग्दर्शन विभावरी देशपांडे आणि श्रीरंग गोडबोले यांनी केले आहे. शाहीर संभाजी भगत यांनी लिहिलेल्या ‘बॉम्बे १७’ या नाटकाचे दिग्दर्शन संतोष वेरुळकर यांनी केले असून मुंबईच्या अद्वैत थिएटर्स संस्थेने या नाटकाची निर्मिती केली आहे.

अतुल पेठे यांचे सहावे नाटक
‘भारत रंग’ महोत्सवामध्ये अतुल पेठे यांनी दिग्दर्शित केलेल्या  ‘आषाढातील एक दिवस’ या नाटकाचा अमृतमहोत्सवी प्रयोग दिल्ली येथे सादर होणार आहे. १९९९ मध्ये हा महोत्सव सुरू झाला. त्या वर्षी ‘सूर्य पाहिलेला माणूस’ नाटक महोत्सवात सादर झाले होते. त्यानंतर ‘आनंद ओवरी’, चौक’ आणि ‘मी माझ्याशी’ या नाटकांचे प्रयोग झाले होते. दोन वर्षांपूर्वी महापालिका सफाई कामगारांना घेऊन निर्मिती केलेल्या ‘सत्यशोधक’ या नाटकाचा प्रयोग झाला होता. तर, यंदाच्या वर्षी ‘आषाढातील एक दिवस’चा प्रयोग होणार आहे. हे नाटक यापूर्वी मुंबई येथील नेहरु सेंटर नाटय़ महोत्सव आणि धारवाड येथील ‘बी. व्ही. कारंथ स्मृती रंग नमना’ या दोन राष्ट्रीय महोत्सवामध्ये सादर झाले होते.