‘सीएनजी’वर धावणाऱ्या रिक्षा व इतर वाहनांची वाढती संख्या लक्षात घेता शहरात सीएनजी पंपांची संख्या आणखी वाढविण्याबाबत सध्या नियोजन करण्यात येत आहे. महाराष्ट्र नॅचरल गॅस कंपनीकडून पुढील महिन्यात तीन नवे पंप सुरू करण्यात येणार असून, त्याशिवाय इतर ठिकाणांचीही चाचपणी सुरू करण्यात आली आहे.
शहरात मागील एक वर्षांमध्ये सीएनजीची मागणी मोठय़ा प्रमाणावर वाढली आहे. रिक्षांसाठी सीएनजीची सक्ती करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे पेट्रोलच्या किमती सातत्याने वाढत असताना वाहने सीएनजीवर परावर्तित करण्याचे प्रमाण वाढले आहे. परिणामी शहरात सीएनजीचा सातत्याने तुटवडा जाणवतो. सीएनजीच्या तुटवडय़ाचा सर्वाधिक फटका रिक्षा चालकांना बसतो. सीएनजीच्या प्रत्येक पंपावर रिक्षा चालकाला बराच वेळ रांगेत थांबावे लागते. त्यातून रिक्षा चालकांच्या व्यवसायावर परिणाम होतो. या पाश्र्वभूमीवर रिक्षा पंचायतीकडून सीएनजीच्या मागणीसाठी आंदोलन सुरू करण्यात आले होते. तीव्र आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर महाराष्ट्र नॅचरल गॅस कंपनीकडून मागील महिन्यामध्ये उंड्री व निगडी येथे दोन पंप सुरू करण्यात आले. त्याचप्रमाणे जूनअखेर आणखी पंप सुरू करण्याचे आश्वासन देण्यात आले. त्यानंतर रिक्षा चालकांनी आंदोलन स्थगित केले.
सीएनजीची मागणी लक्षात घेता महाराष्ट्र नॅचरल गॅस कंपनीकडून जूनअखेर पौड रस्ता, वारजे, नगर रस्ता या तीन ठिकाणी नवे पंप सुरू करण्यात येणार आहेत. त्यामुळे सीएनजीची पुरवठा सुधारण्यास मोठी मदत होऊ शकणार आहे. त्याचप्रमाणे सीएनजी पंपाची मागणी असलेल्या भागामध्ये सध्या चाचपणी सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार पुढील काही दिवसांमध्ये शहरात आणखी काही ठिकाणी सीएनजी पंप सुरू होऊ शकतील.
 ‘सीएनजी’ साठी हेल्पलाइन क्रमांक
सीएनजीबाबत महाराष्ट्र नॅचरल गॅस कंपनीने जाहीर केलेले हेल्पलाइन क्रमांक पुढीलप्रमाणे- तातडीचा क्रमांक- ९६०४०१५४४४, चिखली नियंत्रण कक्ष- ०२०/ ६५१०७५८८, संत तुकाराम नियंत्रण कक्ष- ०२०/६५१०६११९, नरवीर तानाजीवाडी नियंत्रण कक्ष- ०२०/६५१०६८६२.

Story img Loader