पुणे स्टेशन परिसरातील उपाहारगृह भाडेतत्त्वावर देण्याच्या आमिषाने ३१ लाखांची फसवणूक केल्या प्रकरणी बंडगार्डन पोलिसांनी दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी सुनील जोधासिंग भदोरिया (वय ४८) आणि अनिश भदोरिया (वय ३३, दोघे रा. पुणे स्टेशन) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत नितीन अशोक शर्मा (रा. नवी सांगवी) यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
हेही वाचा- महिलेवर बलात्कार प्रकरणी महावितरणमधील लिपिक अटकेत
आरोपींंची वर्षभरापूर्वी शर्मा यांच्याशी ओळख झाली होती. पुणे स्टेशन परिसरातील उपाहारगृह भाडेतत्वावर चालवायला द्यायचे आहे, असे आमिष आरोपींनी त्यांना दाखविले होते. त्यानंतर आरोपींनी त्यांच्याकडून वेळोवेळी ३१ लाख रुपये घेतले. उपाहारगृहाचा ताबा न दिल्याने शर्मा यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक जाधव करत आहेत.