पुणे : पुरंदर विधानसभा मतदारसंघामध्ये सांगली जिल्ह्यातील ३२ हजार ३६६ बोगस मतदार असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर बोगस मतदार वगळण्यासाठी जिल्हा प्रशासनाने स्वतंत्र पथक स्थापन केले आहे. बोगस मतदार वगळण्याची कार्यवाही सुरू झाली असून, मुदतीमध्ये जेवढी नावे वगळतील जातील, तेवढीच नावे वगळण्यात येतील, असे जिल्हा निवडणूक शाखेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
हेही वाचा >>> पुण्यात सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकल्यास आता ५०० रुपये दंड
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार याद्या अद्ययावतीकरण कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. मतदारांची प्रारूप यादी जाहीर केल्यानंतर निवडणूक शाखेकडून त्यावर हरकती आणि सूचना मागविण्यात आल्या होत्या. त्यानुसार पुरंदर विधानसभा मतदारसंघात ३२ हजारांहून अधिक नावे सांगली जिह्यातील पलूस-कडेगाव मतदारसंघातील असल्याबाबत माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी निवडणूक विभागाच्या निदर्शनास आणून दिले होते. बोगस मतदारांची नावे तातडीने वगळण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली होती. या तक्रारीची जिल्हा निवडणूक शाखेकडून तपासणी करण्यात आली. त्यावेळी त्यामध्ये तथ्य असल्याचे आढळून आले होते. त्यामुळे बोगस मतदारांची नावे वगळण्यासाठी स्वतंत्र पथक स्थापन करण्यात आल्याची माहिती निवडणूक शाखेकडून देण्यात आली.
हेही वाचा >>> पिंपरी : मद्यपान करणाऱ्या ३२२ जणांवर कारवाई; २१ लाखांचा दंड वसूल
निवडणूक शाखेकडून पुण्यातील विधानसभा मतदारसंघातील प्रांत अधिकारी, तहसीलदार, मतदान नोंदणी अधिकारी आणि सांगलीतील पलूस विधानसभा मतदारसंघातील संबंधित अधिकाऱ्यांचे विशेष स्वतंत्र पथक तयार करण्यात आले आहे. या पथकाकडून बोगस मतदारांशी संपर्क साधला जाईल. कोणत्या मतदारसंघात नाव हवे, याची विचारणा करून त्यानुसार कार्यवाही केली जाईल, असे निवडणूक शाखेच्या उपजिल्हा निवडणूक अधिकारी मीनल कळसकर यांनी सांगितले. मतदाराला पलूस किंवा पुरंदर यापैकी एका विधानसभा मतदारसंघात नाव ठेवता येणार आहे. दरम्यान, १७ जानेवारी रोजी अंतिम मतदार यादी जाहीर केली जाणार आहे. पुरंदर मतदार संघातील यादीबाबत उशिरा तक्रार आली असून, ३२ हजार ३६६ दुबार नावे रद्द करण्यासाठी प्रत्येक मतदाराला संपर्क साधून एकच मतदार संघातील नाव निश्चित करण्यासाठी परवानगी घ्यावी लागणार आहे. त्यामुळे संबंधित मतदारांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळाला, तरच ही नावे वगळली जाणार आहेत.