पुणे : शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत (आरटीई) प्रवेश प्रक्रियेत प्रवेश निश्चित करण्यासाठी तीन वेळा मुदतवाढ देऊनही प्रवेशाची गती संथच असल्याचे दिसून येत आहे. अद्यापही ३२ हजार जागा रिक्त राहिल्या असून, सोमवारी (२२ मे) प्रवेश निश्चित करण्यासाठी शेवटचा दिवस आहे.
प्राथमिक शिक्षण संचालनायातर्फे आरटीई प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येत आहे. यंदा राज्यातील ८ हजार ८२३ शाळांतील १ लाख १ हजार ८४६ जागा प्रवेशासाठी उपलब्ध आहेत. त्यासाठी एकूण ३ लाख ६३ हजार ४१३ अर्ज दाखल झाले. प्रवेशासाठीच्या सोडतीतून ९४ हजार ७०० विद्यार्थ्यांना प्रवेश जाहीर करण्यात आला. आत्तापर्यंत ६२ हजार ४०० विद्यार्थ्यांनीच प्रवेश निश्चित केल्याचे आरटीई संकेतस्थळावरील आकडेवारीवरून दिसून येत आहे. त्यामुळे जवळपास ३२ हजार जागा रिक्त राहिल्या आहेत.
हेही वाचा – पुणे : सहकारी बँकांची कोंडी अखेर सुटली; आरबीआयने उचलले मोठे पाऊल
आरटीई प्रवेश प्रक्रियेत प्रवेश निश्चित करण्यासाठी आतापर्यंत तीनवेळा मुदतवाढ देण्यात आली. मात्र प्रवेशाची गती संथच असल्याचे वारंवार दिसून आले आहे. पालकांना सोयीची शाळा मिळत नसल्याने प्रवेश निश्चित केले जात नाहीत. त्यामुळे जागा रिक्त आहेत. निवड यादीतील विद्यार्थ्यांची मुदत संपल्यानंतर आता प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांचे प्रवेश सुरू केले जाणार असल्याचे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश निश्चित करण्यासाठीच्या सूचना मिळण्याची प्रतीक्षा आहे.