पुणे : राज्यातील औषधनिर्माणशास्त्र पदवी अभ्यासक्रमाच्या यंदाच्या प्रवेश प्रक्रियेत ३३ टक्के जागा रिक्त राहिल्या आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत रिक्त जागांचे प्रमाण जवळपास तिपटीने वाढल्याचे चित्र आहे. तसेच पदविका अभ्यासक्रमाच्या जागाही मोठय़ा प्रमाणात रिक्त राहिल्या आहेत.  औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमाच्या जागा आणि महाविद्यालयांची संख्या वाढत असल्याने या अभ्यासक्रमाची स्थिती अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमाप्रमाणे होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. 

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गेल्या काही वर्षांपासून राज्यात औषधनिर्माणशास्त्र पदवी अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांचा ओढा वाढल्याचे चित्र होते. पदवी अभ्यासक्रमाच्या बहुतांश जागांवर प्रवेश होत होते. करोना काळात या अभ्यासक्रमाला जास्तच पसंती मिळत होती. राज्य समायिक प्रवेश परीक्षा कक्षाने (सीईटी सेल) दिलेल्या माहितीनुसार  गेल्या वर्षी राज्यात ३९६ महाविद्यालयांमध्ये ३६ हजार ८८८ जागा प्रवेशांसाठी उपलब्ध होत्या. त्यातील ३२ हजार १३७ जागांवर प्रवेश झाले. तर चार हजार ७५१ जागा रिक्त राहिल्या होत्या. यंदा ४५३ महाविद्यालयांमध्ये ४२ हजार ७९४ जागांवर केवळ २८ हजार ४३२ विद्यार्थ्यांनीच प्रवेश घेतला. त्यामुळे १४ हजार ३६२ जागा रिक्त राहिल्या आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा ५६ नव्या महाविद्यालयांची प्रवेश प्रक्रियेत भर पडली होती, तर पाच हजार ९०६ जागा वाढल्या होत्या. मात्र विविध कारणांनी यंदा या पदवी अभ्यासक्रमाच्या ३३ टक्के जागा रिक्त राहिल्याचे दिसून येत आहे.

हेही वाचा >>>विद्यार्थ्यांनो जोमाने अभ्यास करा… दहावी, बारावीच्या परीक्षांचे अंतिम वेळापत्रक जाहीर!

 असोसिएशन ऑफ दि मॅनेजमेंट ऑफ अनएडेड इन्स्टिटय़ूट्स इन रुरल एरिया संघटनेचे अध्यक्ष रामदास झोळ म्हणाले, की राज्य शासनाने औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमासाठी बृहद् आराखडा केला आहे का, हा प्रश्न आहे. औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमाची प्रवेशप्रक्रिया वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या, उदाहरणार्थ, बीएमएसएस, बीएचएमएस, नर्सिग, फिजिओथेरपी अशा अभ्यासक्रमांबरोबर राबवणे आवश्यक आहे. या सर्व अभ्यासक्रमांच्या प्रवेशाची अंतिम तारीख एकच असावी. औषधनिर्माणशास्त्र पदवी आणि पदविका अभ्यासक्रमाची नवी महाविद्यालये मोठय़ा प्रमाणात सुरू झाल्याने प्रवेशाच्या जागा वाढल्या आहेत. हे प्रमाण असेच वाढत राहिल्यास अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या जागा ज्या प्रमाणात रिक्त राहत होत्या, तीच वेळ औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमावर येऊ शकते.

हेही वाचा >>>अभाविप आणि एसएफआयमध्ये मारामारी, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील घटना

औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमाची नवी महाविद्यालये सुरू करण्यास यंदा सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिल्याने  सहा वर्षांनी  अनेक नवी महाविद्यालये सुरू झाली. परिणामी या अभ्यासक्रमाच्या जागा मोठय़ा प्रमाणात वाढल्या.अनेक जुन्या महाविद्यालयांनीही तुकडीवाढ केली. वाढलेल्या जागांच्या तुलनेत प्रवेश न झाल्याने जागा रिक्त राहिल्या. या अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांचा कल अजूनही आहे. मात्र,  वाढलेल्या जागांमुळे भविष्यात गुणवत्ता न राखणाऱ्या महाविद्यालयांतील जागा मोठय़ा प्रमाणात रिक्त राहण्याची शक्यता नाकारता येत नाही.- डॉ. नीरज व्यवहारे, प्राचार्य, डी. वाय. पाटील औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालय, आकुर्डी

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 33 percent vacancies in pharmacy degree pune amy