पुणे : आगामी महापालिका निवडणुकीसाठी महापालिकेकडून प्रभागनिहाय अंतिम मतदार यादी करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यानुसार शहरात ३४ लाख ५४ हजार ६३९ एवढे मतदार असून औंध-बालेवाडी (प्रभाग क्रमांक १२) या प्रभागात सर्वाधिक ८२ हजार ५०४ मतदार असून मगरपट्टा-साधना विद्यालय (प्रभाग क्रमांक २४) या प्रभागात सर्वात कमी मतदार आहेत. या प्रभागात ३३ हजार ८२५ एवढ्या मतदारांची नोंद करण्यात आली आहे.
आगामी महापालिका निवडणुकीसाठी प्रभागनिहाय अंतिम मतदार यादी जाहीर करण्याची मुदत संपुष्टात आल्यानंतरही महापालिकेच्या निवडणूक शाखेला मुदतीमध्ये अंतिम यादी जाहीर करता आली नव्हती. बहुतांश प्रभागात मतदारसंख्येबाबत घोळ कायम राहिल्याने यादी जाहीर करण्यास विलंब लागल्याचे स्पष्ट झाले होते. त्यानंतर शनिवारी महापालिकेच्या निवडणूक शाखेकडून अंतिम मतदार यादी जाहीर करण्यात आली. महापालिकेच्या संकेतस्थळावर मात्र ३८ प्रभागांच्या याद्या जाहीर करण्यात आल्या आहेत. मात्र अंतिम मतदार यादी पूर्ण झाल्याची माहिती निवडणूक शाखेकडून देण्यात आली. आगामी निवडणुकीसाठी प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी निवडणूक शाखेकडून जाहीर करण्यात आली होती. त्यावर साडेपाच हजार हरकती-सूचना आल्या दाखल झाल्या होत्या. प्रारूप मतदार याद्यात अनेक त्रुटी असल्याच्या तक्रारी आणि आक्षेप राजकीय पक्षांकडून घेण्यात आले होते. बहुतांश प्रभागातील हजारो मतदार दुसऱ्या प्रभागात दाखविण्यात आले होते. राज्य निवडणूक आयोगाने स्थळ पाहणी करून हरकती-सूचनांबाबत निर्णय घेण्याचा आदेश दिल्याने महापालिकेला मुदतीत काम पूर्ण करता आले नाही. त्यामुळे अंतिम मतदार यादी जाहीर करण्यासाठी दोन वेळा मुदतवाढ देण्यात आली होती. मात्र मतदार संख्येचा घोळ कायम राहिल्याने यादीही जाहीर करण्यास विलंब झाला. यादी पूर्ण झाली असली तरी मतदार संख्येचा घोळ कायम आहे. त्यामुळे नेमक्या कोणत्या प्रभागातील मतदार वाढवले, कुठले कमी केले हे स्पष्ट झालेले नाही. शहरातील प्रभागांमध्ये पाच हजारांपेक्षा जास्त मतदारांचे प्रभाग बदलण्यात आल्याचे प्राथमिक स्वरुपात पुढे आले आहे.