शिरूर : शिरूर ,श्रीगोंदा,कर्जत  तालुक्याच्या दृष्टीने शेतीच्या पाण्याचा दृष्टीने व शिरूर व श्रीगोंदा तालूक्यातील पिण्याचा पाण्याचा साठी व रांजणगाव पंचतारांकित औद्योगिक वसाहतीला पाणी पुरवठा करत असलेल्या घोड धरणात ३४% अर्थात १.६५ टीएमएसी उपयुक्त  पाणी साठा  आज ( दिनांक ११ मार्च २०२५ ) अखेर शिल्लक आहे. 

याबाबत अधिक माहिती देताना घोड धरणाचे शाखा अभियंता वैभव काळे यांनी सांगितले की घोड धरणाची एकूण पाणी क्षमता ५.९७ टीएमसी आहे. त्यातील उपयुक्त पाणीसाठा चे प्रमाण ४.८७ टीएमसी आहे. यात अंदाजे ०.००२ टीएमसी पाण्याचे बाष्मीभवन होत असते .

घोड धरणावरती एकूण २३ पाणीपुरवठा योजना ना मंजुरी असून त्यातील सहा पाणी पुरवठा योजना  कार्यान्वित आहे.  शिरूर मधील रांजणगाव पंचतारांकित औद्योगिक वसाहतीतील विविध कंपन्यांना ही या धरणातूनच पाणी जाते. त्याच बरोबर श्रीगोंदा नगरपालिका, काष्टी ग्रामपंचायत , न्हावरा ग्रामपंचायत यांना सुध्दा  घोड धरणातून पिण्याचा पाण्याचा पुरवठा केला जातो. शिरूर नगरपरिषदेची ७१ कोटी रुपये खर्चाची पाणी पुरवठा योजना घोड धरणातून केली जात असून या योजनेचे ही काम सुरु आहे.

घोड धरणाचे उजवा व डावा कॅनाल असे दोन कॅनाल आहेत. उजवा कॅनाल हा शिरूर तालुक्यातून जातो त्याची प्रकल्पीय सिंचन क्षमता ६,१९० हेक्टर इतकी आहे. तर डाव्या कॅनालची क्षमता जो श्रीगोंदा आणि कर्जत तालुक्यातून जातो ती १४,३१० हेक्टर इतकी आहे. डाव्या व उजव्या कॅनाल चे  सिंचन आवर्तन सध्या सुरू आहे.   शेती करीता उजव्या कॅनाल चे सिंचन १८  फेब्रुवारी २०२५ ला सुरु करण्यात आले असून डाव्या कॅनालचे सिंचन २५ फेब्रुवारी २०२५ पासून सुरु करण्यात आले आहे . या दोन्ही कॅनाल ला १.१६ टी.एम.सी पाणी सोडण्यात येत असून घोडनदी पात्रातील कोल्हापूर पध्दतीचे बंधारे भरण्याकरीता घोडनदी मध्ये ही ०.२२३ टीएमसी पाणी सोडण्यात आल्याचे  वैभव काळे यांनी सांगितले. शिरूर सह श्रीगोंदा कर्जत तालुक्यातील शेती व  पिण्याचा पाणी पुरवठा योजना तसेच रांजणगाव पंचतारांकित औद्योगिक वसाहतीतील कंपन्याना  पाणी पुरवठा करत असणा-या घोड धरणाची पाणी पातळी मार्च महिन्याचा मध्या पर्यत ३४% पोहचली असून आगामी काळात वाढत जाणा-या उन्हांमुळे ही पाण्याची पातळी अधिक कमी कमी होत गेल्यास पाण्याचे गहिरे संकट उभे राहू शकते.

Story img Loader