महापालिकेचा जमा आणि खर्चाचा मेळ बसत नसल्यामुळे आगामी आर्थिक वर्षांच्या अंदाजपत्रकात मोठी कपात करावी लागणार असून या अंदाजपत्रकाला किमान ३० ते ३५ टक्क्यांनी कात्री लागण्याची शक्यता आहे.
महापालिका आयुक्त महेश पाठक यांनी खातेप्रमुख व अधिकाऱ्यांची बैठक शुक्रवारी घेतली. या बैठकीत आर्थिक स्थितीचा आढावा घेण्यात आला. पुढील वर्षांत जमा कमी होणार असल्याचे लक्षात घेऊन सर्व खर्चात कपात करण्याबाबतच्या सूचना बैठकीत अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. जकात रद्द झाल्यानंतर स्थानिक संस्था कर (लोकल बॉडी टॅक्स- एलबीटी) लागू झाला असून या करातून मिळणारे महापालिकेचे उत्पन्न घटले आहे. तसेच त्यातील जो वाटा राज्याकडून परस्पर वसूल केला जातो, ती रक्कमही महापालिकेला मिळालेली नाही. त्यामुळे आगामी आर्थिक वर्षांचे महापालिकेचे अंदाजपत्रक तयार करताना काटकसरीचे धोरण अवलंबण्याबाबतच्या सूचना बैठकीत देण्यात आल्या.
सध्या जे प्रकल्प सुरू आहेत ते पूर्ण करण्यावरच भर द्यावा, नवे प्रकल्प प्रस्तावित करू नयेत. सध्या जे प्रकल्प व कामे सुरू आहेत त्यावरील प्रस्तावित खर्चात कपात करता येईल का, याचा विचार करावा, अशाही सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या असून एकूण परिस्थिती पाहता आगामी सन २०१४-१५ च्या महापालिका अंदाजपत्रकाला ३० ते ३५ टक्क्य़ांनी कात्री लागेल अशी परिस्थिती आहे. मेट्रोसाठी कंपनी स्थापन करण्याची कार्यवाही सुरू झाली असून मेट्रोसाठी महापालिकेला आगामी वर्षांत तरतूद करावी लागणार आहे. तसेच चालू प्रकल्प पूर्ण होण्यासाठी देखील मोठी तरतूद लागणार आहे.

Story img Loader