गेली दोन वर्षे करोना संसर्ग असल्याने दिवाळीचा सण बेताने साजरा करण्यात आला होता. यंदाच्या वर्षी दिवाळीत मार्केट यार्डातील भुसार बाजारात ३५० कोटी रुपयांची उलाढाल झाली आहे. गेल्या वर्षी दिवाळीत भुसार बाजारात २२८ कोटी रुपयांची उलढाल झाली होती. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा भुसार बाजारातील उलाढालीत १२२ कोटी रुपयांनी वाढ झाली आहे.
करोनाचे सावट दूर झाल्यानंतर भुसार बाजारात उलाढाल वाढल्याने यंदा दिवाळीची बाजार समितीसह व्यापाऱ्यांसाठी आनंददायी ठरली आहे. करोना संसर्गामुळे गेले दोन वर्ष दिवाळीतील उलाढालीवर परिणाम झाला होता. बाजारात खरेदीचा फारसा उत्साह जाणवला नव्हता. यंदा दिवाळीत भुसार बाजारात मोठी उलाढाल झाली. बाजार समितीच्या भुसार विभागात ३५० कोटी रुपयांची उलाढाल झाली. गेल्या दिवाळीच्या तुलनेत यंदा भुसार बाजारातील उलाढालीत १२२ कोटी रुपयांनी वाढ झाली आहे. गेल्या काही वर्षांपासून अन्नधान्य ऑनलाइन खरेदीचे प्रमाण वाढले असले, तरी प्रत्यक्ष बाजारात जाऊन खरेदी करण्याचे प्रमाणही मोठे आहे. मार्केट यार्डातील भुसार विभागात पुणे शहर, उपनगर तसेच जिल्ह्यातील खरेदीदारांची दिवाळीत खरेदीसाठी मोठी गर्दी झाली होती. भुसार बाजारातून मागणी वाढल्याने अन्नधान्याची आवक मोठ्या प्रमाणावर झाली.
भुसार बाजारात आवक वाढली
यंदा भुसार बाजारात तब्बल ९७ हजार ८७३ क्विंटल अन्नधान्याची जादा आवक झाली. आगामी महापालिका निवडणुकांमुळे इच्छुकांकडून प्रभागात जीवनावश्यक वस्तूंचा संचाचे (किट) वाटप करण्यात आले. निवडणुकांमुळे खरेदीत वाढ झाली.
करोनाचे सावट दूर झाल्यानंतर यंदा दिवाळी उत्साहात साजरी करण्यात आली. गेल्या दोनतीन वर्षांच्या तुलनेत भुसार बाजारात यंदा ग्राहकांनी मोठ्या प्रमाणावर खरेदी केली. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा दिवाळीत १२२ कोटी रुपयांनी उलाढाल वाढली.- प्रशांत गोते, विभाग प्रमुख, भुसार बाजार, पुणे
कृषी उत्पन्न बाजार समिती
दिवाळीत आटा, रवा, मैदा, बेसन, पोहे, विविध प्रकारचे मसाले, तेल, तूप, साखरेला मागणी होती. मिठाईऐवजी सुकामेवा भेट देण्याकडे नागरिकांचा कल वाढला आहे. सुकामेव्याची विक्री मोठ्या प्रमाणावर झाली. यंदा भुसार बाजारात खरेदीसाठी उत्साह होता.- राजेंद्र बाठिया, अध्यक्ष, दी पूना मर्चंट्स चेंबर