पिंपरी-चिंचवडमध्ये शाहू नगर येथील डी. वाय. पाटील शाळेत साडेतीनशे विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याचे समोर आले आहे. या गंभीर घटनेनंतर शाळा प्रशासनाने पालकांची माफी मागितली असून दिलगिरी व्यक्त केली आहे. पहिली ते चौथीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना अल्पोपहार म्हणून ब्रेड आणि चटणी देण्यात आली होती. यानंतर विद्यार्थ्यांना उलटी आणि मळमळल्यासारखं झाल्याने काही विद्यार्थ्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं.

हेही वाचा >>> म्हाडाच्या पुणे मंडळाच्या क्षेत्रातील ६,२९४ घरांच्या सोडतीच्या अर्ज विक्री-स्वीकृतीस सुरुवात, ५ डिसेंबर रोजी सोडत

पिंपरी-चिंचवडमध्ये शाहू नगर येथील डी. वाय. पाटील शाळेतील साडेतीनशे मुलांना ब्रेड आणि चटणी खाल्ल्याने विषबाधा झाली आहे. या घटनेमुळे पालकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. शाळा प्रशासनाबद्दल पालकांनी नाराजी व्यक्त केली आहे. शाळेत आज अल्पोपहार ठेवण्यात आला होता. पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना ब्रेड आणि चटणी हा मेनू देण्यात आला. अल्पोपहार घेतल्यानंतर काही मिनिटांतच विद्यार्थ्यांना उलटी, मळमळल्यासारखं व्हायला लागलं, काही विद्यार्थ्यांना भोवळ आली, त्यामुळे तातडीने काही विद्यार्थ्यांना रुग्णालयात नेण्यात आलं. इतर विद्यार्थ्यांना पालकांसोबत घरी पाठवण्यात आलं. यावेळी शाळेने हलगर्जीपणा केल्याचा आरोप पालकांनी केला आहे. विद्यार्थ्यांना निकृष्ट दर्जाचं अन्न खाऊ घालणाऱ्या दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे.

हेही वाचा >>> दांडीया कार्यक्रमात टोळक्याची दहशत, तरुणावर कोयत्याने वार; सराइतासह साथीदारांविरुद्ध गुन्हा

शाळा प्रशासन काय म्हणाले?

“शाळेत आज अल्पोपहार ठेवला होता. ब्रेड आणि चटणी मेनू होता. ३०० ते ३५० मुलांना विषबाधा झाली आहे, ही गंभीर घटना आहे; आम्ही सर्व पालकांची माफी मागतो. हॉस्पिटलमध्ये मुलांना नेण्यात आलं आहे. खाण्याचं जे काही साहित्य आणलं आहे, त्याची टेस्ट करणार आहोत. पहिली ते चौथीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना खायला दिलं आहे. ही शाळा महाराष्ट्र शासनाने मान्यता दिलेली शाळा आहे. संबंधित व्यक्तींवर कारवाई करण्यात येईल.” अभय कोतकर– संचालक, डी.वाय. पाटील शाळा