शहरात राजकीय पक्ष तसेच राजकीय कार्यकर्त्यांकडून लावण्यात आलेले फलक, फ्लेक्स तसेच होर्डिग तातडीने काढण्याचे आदेश महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी दिल्यानंतर फलकांवर कारवाई सुरू झाली असून शनिवारी दिवसभरात साडेतीन हजार फलक हटवण्यात आले.
विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होताच आयुक्तांनी महापालिकेतील सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन बैठकीत आचारसंहितेबाबत माहिती दिली. शहरात अनेक राजकीय पक्षांतर्फे फलक उभारण्यात आले आहेत. तसेच राजकीय नेते व कार्यकर्त्यांकडून फ्लेक्सही मोठय़ा प्रमाणावर लावण्यात आले आहेत. शहरात अनेक ठिकाणी राजकीय होर्डिग लागली असून या सर्वावर तातडीने कारवाई करा, असा आदेश या बैठकीत आयुक्तांनी दिला. सर्व क्षेत्रीय कार्यालयांनी त्यांच्या कार्यकक्षेतील किती फलक उतरवले याचा अहवाल एका दिवसात सादर करावा, अशीही सूचना आयुक्तांनी दिली आहे.
महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश बकोरिया, अतिरिक्त आयुक्त राजेंद्र जगताप, तसेच सर्व खाते प्रमुख, विभाग प्रमुख, उपायुक्त, सहमहापालिका आयुक्त या बैठकीत उपस्थित होते. आचारसंहितेला अनुसरून अधिकाऱ्यांकडून काय कार्यवाही अपेक्षित आहे, कोणत्या बाबी या काळात करता येतील, कोणत्या करता येणार नाहीत याचीही माहिती यावेळी देण्यात आली. आदर्श आचारसंहिता नियम, त्यातील अद्ययावत सूचना, निवडणूक नियमावली, निवडणुकीसंबंधीचे नियम, कायदे, संदर्भ यांची माहिती देणारी अद्ययावत पुस्तिका तयार करण्याचाही आदेश या बैठकीत आयुक्तांनी दिला.
यापूवी झालेल्या निवडणुकात कोणत्या ठिकाणी किती मतदान केंद्र होती, तेथील वीज, पाणी आदीची व्यवस्था कशी करण्यात आली होती याचा आढावा घेण्याबरोबरच मंडप परवानगी, सभेची परवानगी याबाबतच्या सूचना व परवानगी आदींचे नियोजन करण्याचे आदेशही आयुक्तांनी बैठकीत दिले.
बैठकीतील आदेशानुसार शनिवारी शहरात कारवाई सुरू झाली. फ्लेक्स, कापडी फलक, झेंडे, होर्डिग यावर कारवाई करण्यात आली. दिवसभरात ७०१ कापडी फलक, १०५६ फ्लेक्स, २४९ झेंडे, तीन हजार छोटे फलक आदींवर कारवाई करण्यात आल्याचे अतिक्रमण विभागाचे प्रमुख माधव जगताप यांनी सांगितले. महापालिकेची पंधरा क्षेत्रीय कार्यालये आणि अतिक्रमण विभाग यांनी संयुक्तरीत्या ही कारवाई केली. आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी होण्याच्या दृष्टीने ही धडक कारवाई करण्यात आली. अतिक्रमण विभागाचे अधिकारी, कर्मचारी व पोलीस यावेळी उपस्थित होते.
निवडणूक आघाडीवर..
– राजकीय फलक उतरवण्याची कार्यवाही सुरू
– पालिका अधिकाऱ्यांना आचारसंहितेबाबत माहिती
– निवडणूक नियमावलीसंबंधी पुस्तिका तयार करणार
आचारसंहिता लागताच शहरातील साडेतीन हजार फलक हटवले
विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होताच र फलकांवर कारवाई सुरू झाली असून शनिवारी दिवसभरात साडेतीन हजार फलक हटवण्यात आले.
आणखी वाचा
First published on: 14-09-2014 at 03:30 IST
TOPICSआचारसंहिता
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 3500 flex removed