पीएमपीमध्ये तेवीसशे वाहक आणि तेराशे चालकांची भरती करण्याच्या प्रस्तावाला संचालक मंडळ बैठकीत गुरुवारी एकमताने मंजुरी देण्यात आली. ही भरती पूर्णत: पारदर्शक पद्धतीने केली जाईल आणि भरतीची संपूर्ण प्रक्रिया राबवण्याचे काम महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लि. (एमकेसीएल) या मंडळाला दिले जाणार आहे.
पीएमपी संचालक मंडळाच्या बैठकीतील या निर्णयाची माहिती नगरसेवक आणि पीएमपीचे संचालक प्रशांत जगताप यांनी पत्रकार परिषदेत दिली. पीएमपीच्या साडेसहाशे नव्या गाडय़ा जवाहरलाल नेहरू योजनेतील अनुदानातून मंजूर झाल्या असून पाचशे गाडय़ा भाडे तत्त्वावर घेण्यात येत आहेत. या गाडय़ांसाठी चालक व वाहकांची आवश्यकता लक्षात घेऊन भरतीचा प्रस्ताव संचालकांपुढे मंजुरीसाठी ठेवण्यात आला होता. तो गुरुवारी मंजूर करण्यात आल्याचे जगताप म्हणाले.
पीएमपीच्या भरतीत वशिलेबाजी होते, तसेच योग्य पद्धतीने उमेदवारांची निवड केली जात नाही, भरतीची प्रक्रिया पारदर्शक नसते असे आरोप नेहमी केले जातात. त्याचा विचार करून पुणे महापालिकेतील भरतीसाठी जी प्रक्रिया राबवली जाते, तशीच प्रक्रिया या भरतीत राबवावी, असा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार ही भरती पीएमपी प्रशासनातर्फे केली जाणार नाही. भरतीची संपूर्ण प्रक्रिया एमकेसीएल मार्फत राबवली जाईल. उमेदवारांना अर्ज उपलब्ध करून देणे, अर्ज मागवणे, आलेल्या अर्जाची छाननी, लेखी परीक्षेसाठी पात्र उमेदवारांची यादी तयार करणे, शंभर गुणांच्या लेखी परीक्षेनंतर उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावणे व अंतिमत: उमेदवारांची निवड यादी तयार करणे अशी संपूर्ण प्रक्रिया या मंडळामार्फत राबवली जाणार असल्याचे सांगण्यात आले. उमेदवारांना ९० गुणांची लेखी परीक्षा द्यावी लागेल व मुलाखतीसाठी १० गुण असतील.
दहा डेपोंमध्ये गाडय़ा धुण्यासाठी यंत्रणा
पीएमपीच्या दहा डेपोंमध्ये गाडय़ा धुण्यासाठी स्वयंचलित यंत्रणा बसवण्याचा प्रस्ताव संचालक मंडळाने गुरुवारी मंजूर केला. मोरया इंडस्ट्रीज या कंपनीला हे काम देण्यात आले आहे. यंत्रणा बसवणे व ती चालवणे ही दोन्ही कामे संबंधित कंपनीतर्फे केली जातील.

Story img Loader