पिंपरी महापालिकेच्या १३९ जागांपैकी ३८ जागा ओबीसींसाठी आरक्षित होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अनुसूचित जाती आणि जमातीचे यापूर्वी निश्चित केलेले आरक्षण कायम राहणार आहे.
Pune Municipal Election : निवडणुकीत चार सदस्यीय प्रभाग? ; कायदेशीर प्रक्रियेची तपासणी
ओबीसी आरक्षणासह निवडणुका झाल्यास पिंपरी पालिकेतील जागांची समीकरणे व राजकीय गणिते पूर्णपणे बदलणार आहेत. एकूण ४६ प्रभागसंख्या असलेल्या पिंपरी पालिकेची एकूण सदस्यसंख्या १३९ राहणार आहे. त्यामध्ये पुरुष सदस्य ६९ व महिला सदस्यसंख्या ७० अशी वर्गवारी राहणार आहे. अनुसूचित जातींसाठी २२ जागा असून त्यापैकी ११ महिलांसाठी राखीव असतील. अनुसूचित जमातींसाठी तीन जागा असून त्यापैकी २ जागा महिलांसाठी राखीव असणार आहेत. सर्वसाधारण ११४ जागा असणार आहेत. त्यापैकी ५७ महिलांसाठी राखीव असतील, असे आतापर्यंतचे जागांचे वाटप होते.
ओबीसींच्या एकूण जागांपैकी ५० टक्के जागा महिलांसाठी आरक्षित –
२७ टक्के ओबीसी आरक्षणानुसार ३८ जागा ओबीसींसाठी आरक्षित होऊ शकतील. निवडणूक विभागातील अधिकाऱ्यांच्या मते आरक्षण कपातीची शक्यता गृहीत धरून ही संख्या ३५ देखील होऊ शकते. ओबीसींच्या एकूण जागांपैकी ५० टक्के जागा महिलांसाठी आरक्षित असतील. ओबीसींचे आरक्षण स्पष्ट झाल्यानंतर सर्वसाधारण गटातील आरक्षण निश्चित केले जाईल. त्यामुळे खुल्या गटातील जागांचे गणित पूर्णपणे बदलणार आहे.
आरक्षित जागांविषयी आताच भाष्य करणे घाईचे –
“ राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार पुढील कार्यवाही केली जाईल. आरक्षित जागांविषयी आताच भाष्य करणे घाईचे होईल.” अशा माहिती निवडणूक सहायक आयुक्त बाळासाहेब खांडेकर यांनी दिली आहे.
अनेक प्रभागांमधील समीकरणे बदलणार –
“ओबीसी आरक्षणामुळे शहरातील अनेक प्रभागांमधील समीकरणे बदलणार आहेत. याबाबतचे चित्र स्पष्ट होईल त्यानुसार राजकीय गणिते नव्याने मांडावी लागणार आहेत.” असं राष्ट्रवादी काँग्रेसचे शहाराध्यक्ष अजित गव्हाणे म्हणाले आहेत.